मच्छीमारांना समुद्रात प्रवास करणे कठीण तर प्रशासनाचे दुर्लक्ष
भाईंदर : उत्तन येथून खोल समुद्रात जाण्याकरिता मार्गदर्शक असलेल्या दीपस्तंभाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन समुद्रात प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या दीपस्तंभाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली आहे.
उत्तन येथे समुद्रकिनारा लाभला असल्यामुळे या भागातील नागरिक अनेक पिढय़ांपासून मच्छीमारीचा व्यवसाय करत आहेत. या किनाऱ्यावरून समुद्रात जाण्याकरिता आवश्यक असलेला दीपस्तंभ नादुरुस्त झाला असल्यामुळे त्याच्या पुनर्निर्माणाचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. याकरिता साधारण १५ कोटी रुपये इतका निधी खासदार राजन विचारे यांनी दिला होता. परंतु नव्याने तयार करण्यात येणाऱ्या दीपस्तंभाचे काम कित्येक महिन्यांपासून रखडले गेले असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना समुद्रात प्रवास करणे कठीण झाले आहे. ज्या कंत्राटदाराला दीपस्तंभ निर्मितीचे काम सोपवण्यात आले आहे. कदाचित त्याला या निर्मितीचा अनुभव नसल्यामुळे अधिक निधीची आवश्यकता भासत असल्याचे आरोप मच्छीमारांनी केले आहेत.
दीपस्तंभाचा मुख्य उपयोग
खुल्या समुद्रात जाण्याकरिता समुद्रामध्ये खडकांच्या लगत असलेल्या मार्गातून मच्छीमारांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे दीपस्तंभच्या आधाराने मच्छीमारांना समुद्रात प्रवास करणे सोयीचे होते. तसेच समुद्रात असलेल्या मच्छीमारांना लांबूनदेखील दीपस्तंभाच्या आधारे त्या-त्या जागेविषयी माहिती मिळणे शक्य होते.
या संदर्भात आम्ही शासनाला तक्रार केली असून लवकरच काम पूर्ण करण्यास पत्रव्यवहार केला आहे.
– बर्नड डिमेलो,कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार समिती