भाजप नेत्यांकडून राजन विचारे लक्ष्य

ठाणे : शिवसेना-भाजप युती होताच लोकसभा निवडणुकीतील जागांवर काही लाखांच्या फरकाने विजय मिळवण्याचे दावे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात येत असले तरी, स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांत असलेली कटूता कायम आहे. ‘शहराचा खासदार अल्पशिक्षित असावा की सुशिक्षित?’ अशी निनावी फलकबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना खासदार राजन विचारे यांच्याविरोधात मोहीम सुरू केली असतानाच, भाजपचे ठाण्यातील नेते मिलिंद पाटणकर यांनी समाजमाध्यमावर ठाण्याचा ‘खासदार सुशिक्षितच असावा’ असे मत मांडल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे.

मिलिंद पाटणकर यांनी समाजमाध्यमावर अशी पोस्ट टाकून परांजपे यांच्या तुलनेत  कमी शिक्षण घेतलेले विद्यमान खासदार विचारे यांना अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

‘पालिकेने व दुसऱ्याने केलेली कामे स्वत:च्या नावावर खपविणारा खासदार तर नसावाच’, असे मतही पाटणकर यांनी या पोस्टमधून मांडले आहे. यापूर्वी स्थानिक विकासकामांचे श्रेय घेण्यावरून शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांत रंगलेला कलगीतुरा पाहता पाटणकर यांनी विचारे यांना हा टोमणा मारल्याची चर्चा आहे.

पाटणकर यांच्या फेसबुक पोस्टमध्ये ठाण्याचाच काय कुठलाही लोकप्रतिनिधी शिक्षित असावा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. ‘ठाण्याच्या बाबतीत तर तो आदरणीय रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, प्रकाश परांजपे यांच्या बरोबरीचा असावा.

पालिका व एमएमआरडीएने केलेली वा ज्या कामांचा पाठपुरावा अनेकजणांनी केला आहे अशी – ठाणे स्थानक, तलाव सुशोभीकरण, तीन पूल, रस्ता रुंदीकरण, समूहविकास प्रकल्प इत्यादी कामे स्वत:च्या नावावर खपविणारा खासदार नसावा, असे त्यांनी म्हटले.

भाजपच्या नाराजीचे कारण

* राजन विचारे यांचे पुतणे मंदार यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे चंदनवाडी सिद्धेश्वर तलाव भागातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ यांचे नगरसेवक पद शुक्रवारी रद्द झाले.

* शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय सोनार यांच्या तक्रारीमुळे भाजपचे गटनेते नारायण पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पवार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार केल्यामुळे त्यांचेही नगरसेवकपद धोक्यात आहे.