नाल्यात ढकलण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये येऊन मुजोर रिक्षाचालकांना तंबी दिली असताना वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या महिला गृहरक्षकाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा प्रकार रविवारी डोंबिवलीत घडला. या रिक्षाचालकाने तिला नाल्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रिक्षाचालकास अटक करण्यात आली आहे.

सुनीता रामनारायण नंदननेर, असे पीडित गृहरक्षकाचे (होमगार्ड)नाव आहे. त्या डोंबिवली पूर्वेतील रामनगर रिक्षा वाहनतळावर वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होत्या. त्या वेळी रवी नंदलाल गुप्ता याने आपली रिक्षा वाहनतळाएवेजी भररस्त्यात उभी केली. ‘तुमच्या रिक्षामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने रिक्षा वाहनतळावर उभी करा’ असे सुनीता यांनी रवी गुप्ता याला सांगितले. पण, रवीने त्यास जुमानले नाही. त्यावर तू ऐकत नसशील तर रामनगर वाहतूक पोलीस ठाण्यात चल, असे सुनीता यांनी त्यास बजावले. यामुळे संतापलेल्या रवीने सुनीता यांना रिक्षात बसवून रिक्षा रामनगरऐवजी ठाकुर्लीच्या दिशेने वेगाने नेली. मात्र, पोलीस ठाण्यात आल्याशिवाय रिक्षातून उतरणार नाही, असा पवित्रा सुनीता यांनी घेतला.

ठाकुर्लीतील नव्वद फुटी नवीन रस्त्यावर रिक्षा पोहोचली असता रवीने सुनीता यांना रिक्षातून उतरण्यास सांगितले. पण, त्यास नकार दिल्याने रवीने त्यांना रिक्षातून बाहेर ओढून मारहाण केली. तसेच बाजूच्या नाल्यात ढकलून देण्याचा प्रयत्न केला. सुनीता यांना ठाकुर्ली येथे सोडून तेथून रिक्षा घेऊन रवी पळून गेला.

रवी गुप्ता या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्याने महिला गृहरक्षकावर हात उचलल्याने त्याच्यावर आणखी काही कारवाई करता येते का याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत.   – गौतम गंभिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग, डोंबिवली

मुंब्य्रात आठ वर्षीय मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

ठाणे : मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड भागातील मैदानात खेळत असलेल्या शिरीन शेख या आठ वर्षीय मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून एका अनोळखी व्यक्तीने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीड महिन्यापूर्वी हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ४० टक्के भाजल्याने शिरीनवर गेल्या दीड महिन्यापासून नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड परिसरात इरफान शेख राहतात. त्यांना सकलय, झीनत, अयान, शिरीन, अब्दुल रहेमान आणि नाहेदा अशी सहा मुले आहेत. शिरीन ही सायंकाळी शाळेतून घरी परतल्यानंतर नेहमीप्रमाणे मैदानात खेळण्यासाठी गेली. तिथे एका अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करत अंगावर रॉकेल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मैदानात आरडाओरड सुरू झाल्यानंतर शिरीनची आई कलीमउन्नीसा मैदानात धावत गेल्या. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तेथील नागरिकांच्या मदतीने कलीमउन्नीसा यांनी शिरीनला मुंब्य्रातील एका खासगी रुग्णालयात नेले. काही दिवसानंतर तिला नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्य्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. के. तायडे यांनी दिली.