‘लोकसत्ता लोकांकिका’ ठाणे विभागीय अंतिम फेरीस उदंड प्रतिसाद; गडकरी रंगायतनच्या प्रांगणात महाविद्यालयीन ‘माहोल’

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत दुपारपासून गडकरी रंगायतनच्या दिशेने दाखल होणारे तरुणाईचे जत्थे, नाटय़गृहाच्या प्रांगणात सामूहिक सेल्फी काढण्याचा रंगलेला सोहळा, स्पर्धकांची लगबग आणि हा सगळा महाविद्यालयीन ‘माहोल’ पाहण्यासाठी दुपारपासूनच जमलेले ठाणेकर नाटय़रसिक.. गडकरी रंगायतनमध्ये गुरुवारी पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय अंतिम फेरीच्या निमित्ताने तयार झालेले हे वातावरण मराठी रंगभूमीच्या उज्ज्वल भविष्यकाळाची आणि तरुणाईच्या उत्साहाची प्रचीती देणारे होते.

ठाणे, वसई आणि डोंबिवलीच्या पाच महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये आपले स्थान पटकावले होते. सायंकाळी चार वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी दुपारपासून कलाप्रेमी ठाणेकरांनी गडकरी रंगायतनमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ठाणे, नवी-मुंबई, वसई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि मुंबई या भागातून ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी आणि नाटय़प्रेमी रसिकांनी या स्पर्धेसाठी गर्दी केली होती. स्पर्धेत एकांकिका सादर करण्यासाठी स्पर्धकाची लगबग मोठय़ा प्रमाणात होती. नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीताच्या साथीने एकांकिकेचे सादरीकरण अधिक परिणामकारक पद्धतीने करण्यासाठी कलावंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. ठाण्यातील सर्वोत्तम व्यासपीठ अशी ओळख असलेल्या गडकरी रंगायतनच्या रंगमंचावर कला सादर करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आणि जबाबदारीची जाणीव अशी संमिश्र भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. वसईच्या विवा महाविद्यालयाची ‘दिल-ए-नादान’, कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाची ‘हंगर आर्टिस्ट’, ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘असणं-नसणं’, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या कलाकारांची ‘रात्रीस खेळ चाले’ आणि आयएमकॉस्ट महाविद्यालयाची ‘मजार’ या पाच एकांकिका या व्यासपीठावर सादर झाल्या. आपल्यातील कल्पकता, उत्स्फूर्त आणि अभिजात नाटय़कलेचे दर्शन घडवण्यासाठी या तरुणांचा उत्साह सळसळत होता.

गडकरीच्या प्रांगणात दाखल होणाऱ्या महाविद्यालयीन कलाकारांचे रसिकांकडून स्वागत केले जात होते. या गोंधळातही स्पर्धक टिम जागा मिळेल तिथे शेवटचा सराव करण्यात मग्न होती. रंगमंचावर एकीकडे तरुण नेपथ्यकारांची सेट लावण्याची धडपड सुरू असतानाच विंगेत कलावंत एकाग्रता साधण्यासाठी सामूहिक ओंकार साधना करताना दिसत होते.

अशा जल्लोषपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मराठी रंगभूमीचे भविष्यच यानिमित्ताने रसिकांना पाहायला मिळत होते. व्यावसायिक आणि प्रायोगिक दोन्ही नाटय़कलांचा संगम या स्पर्धेतून दिसून येत होता. विविधरंगी विषय, आकर्षक नेपथ्य आणि कलाकारांचा सर्जनशील अभिनयाने ठाणेकर नाटय़ रसिकांची मने जिंकली.

प्रायोजक : ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर आहेत, तर ‘अस्तित्व’ या संस्थेची या स्पर्धेसाठी मदत होत आहे.