येत्या शनिवारी वसईत ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रम; पूरस्थिती रोखण्यासाठी संभाव्य उपाययोजनांवर सांगोपांग चर्चा

वसई : ७ जुलै २०१८ हा दिवस वसईकरांसाठी काळा दिवस ठरला. सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने वसई शहराला पुराने वेढा दिला. या काळात शहरातील वीज खंडित झाली. संपर्काची सर्व साधने कोलमडून पडली. वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. वसईने याआधी कधीही न पाहिलेली पूरस्थिती पुढे दहा दिवस कायम होती. उर्वरित जगाशी संपर्क तुटलेल्या वसईकरांना ते दिवस पुन्हा आठवले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. परंतु यंदा तसे होऊ द्यायचे नसेल तर कोणत्या प्रश्नांना समोर ठेवून त्यांची तड लावली पाहिजे, याचा अभ्यास, त्यावर आधारित मते आणि त्यानुसार कृतिआराखडा ठरविण्यासाठी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमात वसई-विरारमधील राजकीय नेतृत्व, तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी एकत्र येणार आहेत.

शनिवार, ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजता वसईतील बाभोळा नाका येथील सनराईज सभागृहात ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रम पार पडणार आहे. या वेळी होणाऱ्या चर्चासत्रात वसई-विरार पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार, पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, वसई पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक आणि हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे सहभागी होत आहेत. वसईवर इतकी भीषण पूरस्थिती का ओढवली, ती मानवनिर्मित होती का, त्यावर उपाययोजना काय, अशा कळीच्या प्रश्नांचा ऊहापोह या वेळी करण्यात येणार आहे.

पुरामुळे वसईतील सामान्यांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला. अनेकांना तर घराबाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले होते. उद्योगांचे कोटय़वधींचे नुकसान झाले.

या तडाख्याने काही काळ सुन्न झालेल्या वसईकरांनी पूरस्थितीला जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्यावर्षी पावसामुळे नव्हे तर मानवाने निसर्गाशी केलेल्या खेळामुळे पूरसंकट ओढावले होते. शहरात जागोजागी माती बेकायदा भराव, बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले, अतिक्रमणे, नालेसफाईतील अक्षम्य दिरंगाई ही कारणे पुढे आली आहेत.

पूरस्थितीमागील कारणे शोधून काढण्यासाठी पालिकेने तज्ज्ञांची सत्यशोधन समिती स्थापन केली आणि कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुरू केली. जूनच्या आधी शहरातील सर्व कामे पूर्ण करण्यावर पालिकेने भर दिला आहे.

पुराच्या समस्येबद्दल वसईकरांना काय वाटते, पालिकेने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’च्या माध्यमातून व्यासपीठ तयार केले जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. या चर्चासत्रादरम्यान वसईकरांना आपल्या समस्या मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कुठे ?

सनराइज सभागृह, होमेज भवन, तिसरा मजला, रिचमंड टाऊन-२, मॅकडोनाल्डच्या वर, बाभोळा नाका, वसई पश्चिम.

 कधी ?

शनिवार, ११ मे २०१९  सायंकाळी ६ वा.

प्रवेश विनामूल्य.