आठवडय़ाची मुलाखत; नरेंद्र बेडेकर, ठाणे नाटय़संमेलनाचे निमंत्रक

ठाण्यात ९६ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे पडघम वाजत असून नाटय़ संमेलनाच्या पूर्वकार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संमेलनाच्या तयारीमध्ये अवघे ठाणेकर सहभागी झाले आहेत. मुख्य नाटय़ संमेलनामध्ये तरुणाईवर अधिक भर देण्यात आला आहे. यातून ठाण्यातील नाटय़ चळवळीला प्रोत्साहन मिळू शकेल, असा विश्वास नाटय़ संमेलनाचे निमंत्रक आणि ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर यांना वाटत आहे. ठाण्यात यंदा प्रथमच होत असलेल्या नाटय़ संमेलनाविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत..

  • ठाण्यातील होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाविषयी सांगा..

नाटय़ संमेलन हा नाटय़कर्मीचा वार्षिकोत्सव असून त्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान केला जातो. ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या नाटय़ संमेलनाच्या कार्यक्रमांना शुक्रवारी, १२ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. मुख्य संमेलनाच्या आठवडाभर अगोदरपासूनच ठाणेकर रसिक नाटय़ संमेलनाच्या जल्लोशात सहभागी झाले आहेत. १९ ते २१ फेब्रुवारीला रोजी तीन दिवस हे संमेलन असले तरी रंगभूमीच्या सर्व घटकांना सामावून घेऊन त्याला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न यंदाच्या नाटय़ संमेलनात ठाणे शाखेच्या वतीने करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या मुख्य संमेलनात उद्घाटन सोहळा, संमेलनाध्यक्षांची मुलाखत, नाटय़ परिषदेच्या विविध शाखांचे कार्यक्रम, मध्यवर्ती शाखेच्या विविध स्पर्धातल्या विजेत्या एकांकिका, बालनाटय़ तसेच मध्यवर्ती शाखेची शिफारसपात्र नाटके, एकपात्री कार्यक्रम, खुले अधिवेशन, समारोप सोहळा आणि कलावंत रजनी हे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे यंदाचे संमेलन नक्कीच भव्यदिव्य असे होत आहे.

  • ठाण्यातील संमेलनाच्या कार्यक्रमांची वैशिष्टय़े काय आहेत?

संमेलनात पहाटेच्या मैफलीचेही आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील तलावाच्या काठावर बसून प्रेक्षकांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे. संमेलनपूर्व कार्यक्रमात एक संगीत नाटक, सात व्यावसायिक नाटके, दोन बालनाटय़े, दोन लोकनाटय़े, दोन संगीत रंगभूमीविषयी विशेष कार्यक्रम होणार आहेत. शिवाय ठाण्यातील कर्णबधिर मुलांचे बालनाटय़, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे नाटय़गुण विकसित करणाऱ्या ‘वंचितांचे रंगमंच’ या उपक्रमातील नाटकांचे सादरीकरण होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेले नवे नाटक ‘चित्रागंद’ तसेच मालवणी बोलीला मंचावर प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या गवाणकरांच्या सन्मानार्थ राज्यातील विविध बोली भाषांचा विशेष कार्यक्रम ‘आमची बोली आमचा बाणा’ हा वेगळा कार्यक्रम इथे होणार आहे. रंगभूमीपूर्व काळ उलगडणारा ‘रंगभूमीचा पूर्वरंग’, रंगभूमीच्या विविध पैलूंचा उलगडा करणारे तीन परिसंवाद, दोन भव्य कलावंत रजनी, स्मरणिकेचे प्रकाशन, ज्येष्ठ रंगकर्मीचा कार्यकर्तृत्वावर आधारित चित्रफितींचे सादरीकरण, चार प्रदर्शन आणि उत्स्फूर्त आविष्काराकरिता खुला रंगमंच, अशी यंदाच्या कार्यक्रमांची रचना आहे.

  • ठाण्यातील नाटय़कर्मीना मानवंदना देणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे प्रयोजन काय?

ठाण्यामध्ये मोठी नाटय़ परंपरा आहे. नटवर्य मामा पेंडसे, संगीतभूषण पं. राम मराठे, रंगकर्मी अशोक साठे, रंगकर्मी दिलीप पातकर, नाटककार श्याम फडके, अभिनेते शशी जोशी यांच्यासारख्या अनेक थोर रंगकर्मीची परंपरा ठाणे शहराला लाभलेली आहे. याशिवाय सध्याच्या काळातील नाटय़ आणि चित्रपट माध्यमांमध्ये काम करणारे कलाकारही मोठय़ा संख्येने ठाणेकर रहिवासी आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतल्याशिवाय हे संमेलन पूर्णत्वास येऊ शकणार नाही. नाटय़कर्मी, नाटककार आणि नाटकांच्या विविध प्रांतांमध्ये मुशाफिरी करणाऱ्यांची ओळख करून देणारा ‘ठाणे तिथे काय उणे’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

  • संमेलनाचे एकूण नियोजन कसे आहे?

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर भव्यदिव्य मंडप साकारण्यात येणार असून त्याची एकूण प्रेक्षक क्षमता सुमारे सहा हजारपेक्षाही जास्त असणार आहे. नाटय़ संमेलनाच्या मुख्य रंगमंचावर २२ फूट उंच नटराज्याची मूर्ती बसवण्यात येणार आहे. कला दिग्दर्शक संजय धबडे आणि प्रकाशयोजना राजू नेरुलकर यांची असणार आहे. संमेलनाच्या मुख्य मंडपामध्ये तीन वेगवेगळी प्रदर्शने लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाटय़ कलाकारांचे फोटो आणि सहय़ांचे सतीश चाफेकर यांचे प्रदर्शन, सतीश खोत यांनी नाटय़कर्मीची काढलेली व्यंगचित्रे आणि के. पी. देशमुख यांनी काढलेल्या दुर्मीळ नाटकांच्या फोटोचे प्रदर्शन प्रदर्शनस्थळी असणार आहेत.

  • नाटय़ संमेलनाचा ठाण्यातील नाटय़ चळवळीवर परिणाम होईल?

एकूणच नाटय़ संमेलनाच्या चळवळींकडे समीक्षकांच्या नजरेतून पाहत असताना तरुण वर्ग नाटकांपेक्षा एकांकिका स्पर्धाकडे अधिक वळू लागला आहे. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर या एकांकिका गाजवणारे तरुण अत्यंत तुरळक संख्येने नाटकाकडे वळतो. असे का होते याचा विस्तृत धांडोळा नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने जयंत पवार, राजन बने, अद्वैत दादरकर, संपदा कुलकर्णी, प्रेमानंद गज्वी, विजू माने यांच्यासारखे मान्यवर करणार आहेत. त्यामुळे तरुण प्रेक्षकांचा आणि रसिकांबरोबरच तरुणांना नाटय़ चळवळीकडे आणण्यासाठीचे विविध मार्ग या संमेलनातून उलगडले जातील, तर नाटय़ क्षेत्रातील शिस्तीचा अभाव, सांघिक कला असूनही भान हरपत जाण्याचा प्रकार याकडे गांभीर्याने पाहत या क्षेत्रात शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्नही नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने होत असतो. शिस्तीकरण, समानीकरण आणि प्रामाणिकपणा या गुणांचा विकास करण्याबरोबर चित्रपट क्षेत्राशी असलेली सकारात्मक स्पर्धा अधिक खिलाडूपणे घेण्याच्या दृष्टीनेही विचारमंथन या व्यासपीठावर होईल. या संमेलनामुळे राज्यनाटय़ स्पर्धाना प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू होईल आणि ठाण्यातील नाटय़ चळवळीच्या अनेक कार्यक्रमांना प्रोत्साहन या संमेलनाच्या निमित्ताने मिळेल, असे मला वाटते.