ठाणे : सिद्धेश्वर तलाव परिसरातील जलकुंभाच्या दुरुस्तीचे काम शनिवारी म्हणजेच २० मार्चला हाती घेण्यात आले आहे. हे काम १५ दिवस सुरू  राहील. त्यामुळे या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

सिद्धेश्वर तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे तीन जलकुंभ आहेत. या जलकुंभांपैकी एक जलकुंभाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामध्ये जलकुंभांचे खांब दुरुस्त करणे, छताचे बांधकाम, संरक्षण भिंतीची दुरुस्ती यांसारखी कामे ठाणे महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या कामांची सुरुवात शनिवारी म्हणजेच २० मार्चपासून करण्यात येणार आहे. हे काम ५ एप्रिलपर्यंत सुरू राहील. या जलकुंभांमधून उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात राहणाऱ्या हजारो कुटुबीयांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दुरुस्ती कामांमुळे जलकुंभांमधून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. या क्षेत्रात पाणीपुरवठय़ासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

खोपट, गोकुळदासवाडी, हंसनगर, परेरानगर, रमाबाई आंबेडकरनगर, लॉरी स्टॅण्ड, चरईतील धोबी आळी, आंबेडकर रोड, चंदनवाडी, पाचपाखाडी, नितीन कंपनी, सव्‍‌र्हिस रोड, पाटीलवाडी, भोलाभय्या चाळ, नुरीबाबा दर्गा रोड, अल्मेडा सिग्नल, कोलबाड, विकास कॉम्प्लेक्स व गोकुळनगर या परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.