वसईत सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन

गणेश जयंतीच्या दिवशी आगमन झालेल्या पाच दिवसांच्या माघी गणपतीचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. माघी गणपती उत्सव साजरा करण्याच्या कार्यक्रमात वाढ होत चालली असून यंदाही वसई तालुक्यात माघी गणपतींचे मोठय़ा जल्लोशात आगमन करण्यात आले. शुक्रवारी दीड दिवसांच्या माघी गणपतीचे विसर्जन करण्यात आल्यानंतर सोमवारी पाच दिवसीय गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

मूळ गणेश चतुर्थीला श्री गणेशाची स्थापना करण्यात आलेली अडचण आणि केलेल्या नवसामुळे माघी गणपतीच्या उत्सवात दर वर्षी सर्वत्र वाढ होत चालली आहे. वसई तालुक्यात नालासोपारा, वसई, माणिकपूर, विरार, वालीव, अर्नाळा आणि तुळिंज या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बसलेल्या बहुसंख्य सार्वजनिक आणि घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन विनाविघ्न पार पडावे यासाठी वसई तालुक्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निर्मळ, नाळे येथे माघी गणेशोत्सव साजरा

निर्मळ येथील पेशवेकालीन पुरातन गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रींचा महाअभिषेक, महाआरती, भंडारा, गणेश हवन व भजन-कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमही या वेळी ठेवण्यात आले होते. श्री गणेश मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा भव्य देखावा या वेळी साकारण्यात आलेला होता. दिवसभरात हजारो गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. तसेच नाळे येथील श्रीराम सेवा समितीच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.