वीज समस्येवरील ‘लाऊडस्पीकर’नंतर महावितरण कामाला; वाढीव वीज देयकांची समस्या मात्र कायम

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : वसईतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्या थेट ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकसत्तातर्फे वीज समस्येवर घेण्यात आलेल्या लाऊडस्पीकर कार्यक्रमाननंतर महावितरण चांगलीच कामाला लागली आहे. या कार्यक्रमाचे फलित म्हणजे महावितरणातर्फे नवीन वीज उपकेंद्र बसविण्यात आले. १२२ नवीन रोहित्रे बसविण्यात आली. तसेच सौर उर्जेद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येऊ  लागला आहे. तसेच शहरी भागातील ६६ किलोमीटर वीजवाहक तारा भूमीगत करण्यात आल्या आहेत. मात्र धोकादायक रोहित्रांना संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झालेले नाही. ग्राहकाना वाढीव वीज देयकांची असलेली समस्या सुटलेली नाही.

वसई-विरार या झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरात वीज ग्राहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. सर्वसामान्य वीजग्राहक यामुळे बेजार झाला होता. सातत्याने येणाऱ्या अवाजवी देयकांमुळे वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले होते. धोकादायक रोहित्रांमुळे दुर्घटना घडत होत्या. उपकेंद्र कमी क्षमतेचे असल्याने वीज ग्राहकांना पुरेशा प्रमाणात वीज मिळत नव्हती. अनेक ठिकाणी धोकादायक वीजवाहक तारा लोंबकळत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत होते. याविरोधात दाद मागण्यासाठी वीज मंडळाचे अधिकारी उपलब्ध होत नव्हते. तर दुसरीकडे मीटरमध्ये फेरफार करून आणि छुप्या मार्गाने होणारी वीजचोरी यांमुळे महावितरणला फटका बसत होता. त्याचा परिणाम ग्राहकांना चांगली सुविधा पुरविण्यावर होत होता. त्यामुळे शहरातील विविध राजकीय संघटना आणि सामाजिक संस्थांमार्फत महावितरणविरोधात मोर्चे काढले जात होते. मात्र समस्या सुटत नव्हत्या. या सर्व समस्या लक्षात घेऊन सर्वसामान्य वीजग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या वीजसमस्यांचे निवारण करण्यासाठी वीज समस्या या विषयावर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ जुलै रोजी नालासोपारा येथील दामोदर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. यावरून वीज समस्या किती गंभीर बनली आहे, याचा प्रत्यय येत होता. या कार्यक्रमाला राज्याचे तत्कालीन उर्जामंत्री चंद्रकात बावनकुळे तसेच महावितरण आणि महापारेषणचे सर्व वरिष्ठ सनदी अधिकारी, कार्यकारी अभियते, परिमंडळाचे मुख्य अभियंते हजर होते. या सर्व अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला.

यामध्ये जागोजागी उघडी असलेली रोहित्रे, वीज वितरण व्यवस्थेत असलेला दोष, सातत्याने येत असलेली वाढीव वीज बिले, नादुरुस्त होणारी वीज मीटर, धोकादायक लोंबकळत असलेल्या वीज तारा या समस्या मंत्र्यांच्या समोर मांडण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा पाऊस पाहता तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन शासनाकडून करण्यात येत असलेल्या सकारात्मक उपाययोजनांची माहिती देऊन वीज संबंधित प्रश्न सोडवण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.

वीज उपकेंद्राच्या कामाला सुरुवात

’ वसई-विरार शहराची लोकसंख्या वेगाने वाढू लागल्याने विविध भागात वीजपुरवठा करण्यासाठी उपकेंद्रांची आवश्यकता होती. कारण जर सध्या स्थितीत सुरू असलेल्या वीज उपकेंद्रात जर तांत्रिक बिघाड झाला, तर त्याचा फटका मोठय़ा प्रमाणावर वीज ग्राहकांना बसून त्याचा परिणाम हा दैनंदिन कामकाजावर व्हायचा. यासाठी महावीतरणतर्फे कामण आणि चिखलडोंगरे येथे उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आली होती.

’ त्याला उपकेंद्राच्या कामाला ‘लोकसत्ता’ च्या ‘लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात तात्काळ मंजुरी देऊन ही कामे पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या नवीन उपकेंद्र तयार करण्यासाठीची जागा महापारेषणच्या ताब्यात दिली असून त्याचेही काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरण तर्फे सांगण्यात आले आहे.

‘लाऊडस्पीकर’नंतर पूर्ण झालेली कामे

वीज पुरवठा नियंत्रणासाठी उपकेंद्र

पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होत असल्याने पावसाळ्यात शहरातील उपकेंद्र पाण्याखाली जात असतात. त्यामुळे वसईच्या विविध भागांतील वीजपुरवठा खंडित होत असतो. अशा स्थितीमध्ये प्रत्येक विभागानुसार वीजपुरवठा नियंत्रित करण्यासाठी महावितरणतर्फे शहरात सात ठिकाणी सबस्टेशन तर वाडा भागात तीन ठिकाणी उपकेंद्र तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील जूचंद्र, पोमण, पारनाका, शिरगाव येथे नव्याने उपकेंद्राचे काम पूर्ण केले आहे. तसेच नालासोपारा येथील आचोळे, नाईकपाडा , जय विजयनगर, वसई तर वाडा येथील करिवली, घोणसाई, अंबाडी येथील उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहेत.

१२२ नवीन राहित्रे बसवली

शहराच्या विविध ठिकाणच्या भागात नव्याने तयार झालेली गृहसंकुले , बैठय़ा चाळी यांना महावितरणतर्फे मोठय़ा प्रमाणात नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र देण्यात आलेल्या वीजजोडण्या या रोहित्रांवर अतिरिक्त भार टाकून देण्यात आल्याने अधूनमधून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते. या प्रकारामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. शहरातील ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी नव्याने रोहित्र बसविण्याची आणि फार वर्षे जुने झालेली रोहित्र बदलण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली होती. याची दखल ऊर्जामंत्री व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणांचे सर्वेक्षण करून रोहित्र बसवली आहेत. शहरात नव्याने १२२ रोहित्र नव्याने लावण्यात आली असल्याची महावितरणतर्फे देण्यात आली आहेत.

सौर उर्जेतून शेतकऱ्यांना वीजपुरवठा

महावितरणतर्फे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज उपलब्ध करून देण्याबरोबर शासन त्यांना सवलत दिली जाते. त्यामुळे विजेच्या खरेदी किमतीपेक्षा शेतकऱ्यांना दिला जाणारा शहरातील ६७ किलोमीटर वीजवाहिन्या भूमिगतविजेचा दर यामध्ये मोठी तफावत असल्याचे महावितरणतर्फे  सांगण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वसई विभागाच्या अंतर्गत ७२ शेतकऱ्यांचे सौरपंपासाठी अर्ज आले होते. त्यापैकी ४७ शेतकऱ्यांना सौरपंपाच्या साहाय्याने वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित शेती पंपाचे काम सुरू आहे.

शहरातील ६७ किलोमीटर वीजवाहिन्या भूमिगत

शहरात लोंबकळत असलेल्या वीज तारांमुळे दुर्घटना होत असल्याने त्या भूमिगत करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांनी केली होती. यानुसार महावितरणतर्फे शहरातील एकूण ६८.९७ पैकी ६७.५९ किलोमीटर वीजवाहिन्या भूमिगत केल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे प्रश्न कायम

वीजवाहिन्याचे भूमिगत प्रस्ताव कागदावरच

किनारपट्टीच्या लगतच्या भागात वारंवार वादळी वारे वाहत असल्याने लोंबकळत असलेल्या अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असतो. यासाठी शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात याव्या, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी केली होती. यावर उपाय म्हणून चक्रीवादळ निर्माण होणाऱ्या भागात वाहिन्या भूमिगत करण्यासाठी ९६ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे  पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळेल, असे आश्वासन तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. मात्र अजूनही याबाबत पावले उचलली गेली नसल्याने वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे.

वाढीव वीजदेयकांचा प्रश्न कायम

वीजग्राहकांना अवाजवी वीज देयके येत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली होती. योग्य रीडिंग न घेतल्यामुळे तर काही ठिकाणी रीडिंग घेण्यासाठी कोणीही गेले नाही तर बहुतांश वेळा अंदाजित वीज देयके काढली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला होता.  मात्र वाढीव वीज देयकांचा प्रश्न अजून सुटला नाही. अद्यापाही विविध ठिकाणच्या उपकेंद्र व महावितरण विभागाच्या कार्यालयात वाढीव वीज देयकांसंदर्भात तक्रार घेऊन ग्राहक येतात. अशा वेळी महावितरणमार्फत तात्पुरता स्वरूपाचे निवारण केले. परंतु पुढील महिन्यात पुन्हा वाढीव देयक येत आहेत.

उघडय़ा रोहित्रांना संरक्षक जाळ्या नाहीत

वसई-विरार शहरात महावितरण तर्फे वीजपुरवठा करण्यासाठी रोहित्र बसविण्यात आले आहेत. या बसविण्यात आलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या नसल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. यासाठी रोहित्रांना संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली होती. सध्या स्थितीत महावितरणचे एकूण ४ हजारांहून अधिक रोहित्र आहेत. त्यातील केवळ ४२६ रोहित्रांना जाळ्या लावण्यात आल्याची माहिती  महावितरणकडून देण्यात आली आहे. तर काही रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे.

‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमातून वसई तालुका इंडस्ट्रीज फेडरेशनतर्फे वसईतील उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या वीज समस्या सोडवण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली होती. यातील बहुतांश कामे चांगल्याप्रकारे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून सुरुवातीला नालासोपारा येथील उपकेंद्र १०० मेगावॉटचे होते, ते उपकेंद्र आता २५० मेगावॉटचे झाले असल्याने वीज उपकेंद्रातील वीजपुरवठा करण्याची क्षमता वाढली आहे. या कार्यक्रमात करण्यात आलेल्या मागण्या बऱ्यापैकी पूर्ण झाल्या आहेत.

– अशोक कोलासो, वसई तालुका इंडस्ट्रीज फेडरेशन अध्यक्ष

महावितरणतर्फे विविध प्रकारची कामे मार्गी लागली आहेत. जी कामे कामे प्रलंबित आहेत, ती कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न महावितरणतर्फे केला जाईल.

– मंदार अत्रे, अधीक्षक अभियंता, महावितरण विभाग, वसई

वीज समस्या सोडवण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’च्या माध्यमातून चांगला प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये सर्व सामान्य वीज ग्राहकांच्या बहुतेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत. महावीतरणतर्फे वीजतारा बदलणे आणि इतर कामेही केली जातात. परंतु त्याचा विशेष असा काही परिणाम झाला नाही. तसेच वीज ग्राहकांच्या प्रश्नासंदर्भात कोकण भवन येथे झालेल्या बैठकीतही आवाज उठविण्यात आला होता.

– जॉन परेरा, अध्यक्ष, वीजग्राहक संघटना