कल्याण-शीळफाटा रस्त्याच्या कडेला व्यंकटेश पेट्रोल पंपासमोर गेल्या काही दिवसांपासून २५ ते ३० आंबा विक्रेत्यांनी तंबू ठोकून आंबा विक्रीचा जोरदार धंदा सुरू केला आहे. रस्त्याच्या कडेला ही आंबा विक्रीची दुकाने असल्याने वाहन चालक रस्त्यावर वाहने उभी करून खरेदी करू लागल्याने हा रस्ता वाहतूक कोंडीचे केंद्र बनू लागला आहे. या भागातील काही स्थानिकांच्या आशीर्वादाने परप्रांतीय मंडळींनी हा उद्योग सुरू केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
२० दिवसांपूर्वी शीळफाटा रस्त्याच्या कडेला व्यंकटेश पेट्रोल पंपासमोर ३० तंबू ठोकण्यात आले. अचानक हे तंबू उभे राहिल्याने परिसरातील रहिवासी, एमआयडीसी अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन दिवसांनंतर या तंबूंमध्ये एका रात्रीत आंब्याची दुकाने सुरू करण्यात आली. या दुकानांमध्ये शीळफाटा रस्त्यावरून प्रवास करणारा वाहन चालक खरेदी करतो. त्यामुळे येथे विक्री करण्यात येणारा आंबा हा नक्की कशा पद्धतीने पिकवला जातो, तो कोठून आणला जातो याची चौकशी करण्यास कोणालाही वेळ नसल्याचे दिसून येते. अन्न व औषध प्रशासनाने या आंबा विक्रीच्या तंबूंवर छापे टाकले तर या विक्रेत्यांचे पितळ उघडे पडेल अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.
रस्त्याच्या कडेची जागा हडप करण्यासाठी भूमिपुत्रांनी ही जागा आंबा विक्रीच्या नावाखाली बळकावली आहे, असा सूरही व्यक्त होऊ लागला आहे. या जागेवर काही स्थानिक नागरिकांनी आंबे विक्रेत्यांना तंबू उभारण्यासाठी सहकार्य केले आहे. या विक्रेत्यांकडून दररोज हप्ते वसुली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तंबूंवर कारवाई
‘हे तंबू उभारण्यासाठी आंबा विक्रेत्यांनी एमआयडीसीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. हा उद्योग रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे केला जात आहे. या आंबा विक्रीबाबत अनेक वाहन चालकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. स्थानिक रहिवाशांचा या विक्रेत्यांना पाठिंबा आहे. या ठिकाणी काही ग्रामस्थांची दहशत असल्याने कारवाई करताना अडथळा येत आहे, अशी माहिती एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांना या बेकायदा आंबा विक्री केंद्राची माहिती देण्यात आली आहे. एमआयडीसी व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त कारवाईत हे तंबू तोडण्याची कारवाई घेण्यात येणार आहे, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.