ठाण्यात अलीकडेच मराठी नाटय़ संमेलन झाले. त्यानंतर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिनही ठाण्यात सर्वपक्षीय एकत्र येऊन मोठय़ा जल्लोषात साजरा होईल, अशी खूणगाठ ठाणेकरांनी मनाशी बांधली होती. परंतु हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच छोटेखानी कार्यक्रम ठेवून हा मराठी राजभाषा दिन संस्थांनी साजरा केला. नाटय़ संमेलनासाठी कोटीची उड्डाणे करून ते यशस्वी करणाऱ्या लोकनेत्यांना या दिनाचा विसर पडला की काय, अशी चर्चा या दिवशी ठाण्यात दिवसभर ऐकायला मिळाली. मराठी रंगभूमी जगली पाहिजे, बालरंगभूमी जगली पाहिजे या वाक्यांचा जागर फक्त तीन दिवसांपुरताच होता का? असाही प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
ठाण्यातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘आम्ही’ या संस्थेने कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून त्यांना अभिवादन केले. घंटाळी मित्रमंडळानेही या दिनी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर ब्रह्मांडकट्टय़ावर पत्रकारांच्या ‘न्यूजलेस कविता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतला मराठी माणूस हा ठाण्यात वास्तव्यास येऊ लागला. नवीन ठाणे शहर म्हणून नावारूपाला आलेले घोडबंदर रोड येथेही मोठय़ा प्रमाणावर मराठी माणूस स्थिरावू लागला आहे, तर जुन्या ठाण्यात अर्थात शहरात अजूनही मराठमोळे वातावरण पाहायला, ऐकायला मिळते. संस्कृतीचे जतन ही तर राजकीय परंपरा असल्याचे शहरात साजरा होणाऱ्या उत्सवावरून दिसून येते.

मराठी भाषा दिन अर्थात कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा शाळाशाळांमध्येही विद्यार्थ्यांना कळेल इतपत साजरा झाला. व्यापक असे त्याचे स्वरूप कुठल्याही शाळेमध्ये दिसून आले नाही. एखादा कार्यक्रम सर्वपक्षीय साजरा करायचा म्हटला की, तो भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होतो, हे दादोजी कोंडदेव येथे झालेल्या चित्रकला स्पर्धेदरम्यान ठाणेकरांनी
पाहिले आहे, अनुभवले आहे. त्यामुळेच मराठी भाषा दिनही तितक्याच व्यापक स्वरूपात सर्वसमावेशक जर झाला तर या दिवसाचे महत्त्व हे नक्कीच भाषाप्रेमींपर्यंत नक्कीच पोहोचेल. भाषेसाठी दिन साजरा करावा अशी सध्यातरी परिस्थिती नाही. परंतु या निमित्ताने कुसुमाग्रजांचे स्मरण हा हेतू आहे. यंदा शासनाच्या वतीने रवींद्र नाटयमंदिर येथे हा मराठी भाषा दिन भव्य स्वरूपात साजरा झाला. भाषेचे संवर्धन करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविणयात आले. तर दीनानाथ नाटय़गृह येथेही मराठी भाषा आपल्या काव्याच्या माध्यमातून जनमाणसांपर्यंत पोहचविणाऱ्या शाहीर साबळे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ लेखका विजया वाड यांना गौरविण्यात आले. तसेच या निमित्ताने मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, हा कार्यक्रम ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी ठाण्यातील रसिकांनी पाल्र्यात गर्दी केली होती हे विशेष.
पाच वर्षांपूर्वी कौशल इनामदार यांनी ‘लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे मराठी अभिमान गीत दिग्गज, नवोदित गायकांना घेऊन सादर केले होते, या गाण्यांचा शुभारंभ भव्य-दिव्य स्वरूपात ठाण्यातील दादोजी कोंडदेव येथे करण्यात आला होता.
त्या कार्यक्रमासही ठाणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. एरव्हीही ठाण्यात नामवंत गायकांच्या गाण्याच्या मैफलीचे मोठय़ा प्रमाणात आयोजन केले जाते. ठाणेकर तिकीट काढून अशा कार्यक्रमांना गर्दी करतात. जर मराठी राजभाषा दिन ठाण्यात भव्य-दिव्य स्वरूपात अगदी तिकीट ठेवून जरी साजरा केला तरी या कार्यक्रमास ठाणेकर उपस्थित राहतील यात शंका नाही. या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून जर पुस्तके खरेदी करून ग्रामीण भागातील वाचनालयांना किंवा शाळांना उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने ती कुसुमाग्रजांना आंदराजली असेल. मराठीला अभिजात दर्जा मिळेल अशी अपेक्षा या वर्षीही होती, परंतु ती फोल ठरली. मराठी भाषेला दर्जा आहेच, गरज आहे त्या भाषेला आपलेसे करण्याची.. एवढे मात्र नक्की.

काशीनाथ गडकरी