दोन महिन्यांपूर्वी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षासाठी ऑनलाइन परवान्याची मागणी करणाऱ्या अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. अंतिम यादीतील यशस्वी महिला, पुरुष गटातील रिक्षाचालकांची मराठी भाषेतून तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.
२९ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत कल्याण पश्चिमेतील केणे गार्डन हॉल, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाजवळ, सिनेमॅक्सच्या बाजूला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. अंतिम यादीत निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी अत्यावश्यक कागदपत्रांसह सकाळी ११ ते दुपारी २, दुपारी अडीच ते ६ या वेळेत दिलेल्या तारखेप्रमाणे उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी नंदकुमार नाईक यांनी केले आहे. गेल्या दोन महिन्यांत कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुमारे साडेतीन हजार अर्ज ऑनलाइन पद्धतीने रिक्षा परवान्यासाठी आले होते. यामधील पाच टक्के परवाने महिलांना देण्यात येणार आहेत. निवड झालेल्या सर्व उमेदवारांची मराठी भाषेतून तोंडी परीक्षा काही निवडक पत्रकारांच्या उपस्थितीत घेण्यात येईल. तोंडी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना परवाना (इरादा) पत्र देण्यावर निर्णय घेण्यात येईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.