ठाणे : राज्य शासनाकडून आधीच करोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे महापालिकेला लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत असतानाच, शहरातील खासगी आस्थापना, बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दूरध्वनी येऊ लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर पालिका साठय़ातून खासगी आस्थापना, बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे विशेष सत्राद्वारे लसीकरण करण्यात येऊ नये आणि या सर्वानी खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला केल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या लससाठय़ावर डोळा ठेवून डल्ला मारण्याच्या बेतात असलेल्या आस्थापनांच्या मनसुब्यावर आता पाणी फेरले आहे.

ठाणे शहरातील विविध भागांत पालिकेमार्फत करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत सव्वातीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेला अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. पालिकेने कोणत्याही विशेष आस्थापनांसाठी किंवा वर्गासाठी लस राखीव न ठेवता लसीकरण खुले ठेवलेले आहे. जसजसा लशींचा साठा उपलब्ध होतो, त्याप्रमाणे पालिका लसीकरण मोहीम राबवीत आहे. या केंद्रांवर पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे असतात. एकीकडे पालिकेला लशींचा तुटवडा जाणवत असतानाच दुसरीकडे खासगी आस्थापना आणि बँकांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष सत्र ठेवण्याची मागणी पालिकेकडे करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही अशी मागणी होत आहे. हे सर्व जण पालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून लसीकरणासाठी गळ घालत आहेत. परंतु पालिकेला उपलब्ध होणाऱ्या साठय़ातून विशेष आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले तर, पालिकेच्या केंद्रांवर लशींचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन उद्रेक होऊ शकतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनीोयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पत्र पाठवून यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

..तर ठाणेकरांमध्ये अंसतोष

पालिकेला प्राप्त होणाऱ्या लशींच्या साठय़ापैकी काही लशी खासगी कंपन्या आणि बँकांना उपलब्ध करून दिल्या, तर पालिका लसीकरण केंद्रांवर लशींचा पुरवठा कमी होईल. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहसंकुलांना खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण करून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे खासगी कंपन्या आणि बँकांना वेगळा न्याय का? त्यांनीही महापालिकेने निश्चित केलेल्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे. महापालिकेकडे मुबलक प्रमाणात लससाठा उपलब्ध होईल, त्या वेळी त्यांच्या मागणीचा विचार करणे सयुक्तिक होईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.