News Flash

इमारतींचा पुनर्विकास रखडला

ग्रामपंचायत काळात बांधलेल्या अनेक इमारती आता मोडकळीस आल्या आहेत.

mbmc
मीरा-भाईंदर महानगरपालिका

बंदरवाडी, खारीगाव, नवघर आणि गोडदेव या चार गावांचा मिळून भाईंदर पूर्व हा परिसर बनला आहे. पूर्वीच्या काळात या ठिकाणी चार गावेच असली तरी आता या गावांच्या पूर्वीच्या सीमा नष्ट होऊन त्याचे पूर्ण शहरीकरण झाले आहे, तरीही नवघर आणि गोडदेव गावांत आजही काही जुनी घरे अस्तित्वात आहेत.

भाईंदर पूर्व भागात नवघर आणि गोडदेव गावात मराठी टक्का शाबूत आहे. आगरी आणि कोळी समाजांचे प्रामुख्याने वास्तव्य या गावांमधून आहे. बंदरवाडी आणि खारीगावातही आगरी समाज आहे, मात्र भिन्न जातीचे, धर्माच्या रहिवाशांची संख्या या ठिकाणी वाढत आहे. या ठिकाणी उभ्या राहिलेल्या बहुतांश इमारती ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेच्या काळात उभ्या राहिल्या आहेत. अत्यंत दाटीवाटीने बांधलेल्या इमारती, अरुंद रस्ते अशी इथली भौगोलिक स्थिती आहे, शिवाय रहिवासी भागातच बांधण्यात आलेल्या औद्योगिक वसाहती हे या भागाचे वैशिष्टय़ आहे. या वसाहतींमधून स्टील उद्योग भरभराटीला आला आहे. एकेकाळी आशिया खंडात मोठा मानला गेलेला स्टील उद्योग या ठिकाणचाच. याशिवाय नाना प्रकारच्या वस्तू या औद्योगिक वसाहतींमधून तयार होत असतात.

येथील आगरी आणि कोळी समाज सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे झुकलेला होता, मात्र तरीही भाजपने या ठिकाणी आपले अस्तित्व राखून ठेवले होते. २०१२ मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत या परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले, त्या पाठोपाठ मराठमोळ्या भागात शिवसेनेनेही आपला जम बसवला. सध्या काँग्रेसचा एकच नगरसेवक पक्षासोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. दोन्ही पक्षांतील नगरसेवकांनी भाजप आणि शिवसेनेची वाट धरली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस आपल्या परंपरागत मतांच्या जोरावर पुन्हा बस्तान बसवू पाहत आहे.

ग्रामपंचायत काळात बांधलेल्या अनेक इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. यातील काही पाडण्यात आल्या आहेत, परंतु या इमारती बांधताना चटई क्षेत्रफळाचा अतिरेकी वापर करण्यात आला असल्याने त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. औद्योगिक वसाहतींचेही अनेक प्रश्न आहेत. या वसाहतींमधून रस्ते, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता अशा मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. रहिवासी क्षेत्रातून स्थलांतरित करून औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र क्षेत्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आधीच रस्ते अरुंद असताना त्यात फेरीवाल्यांचे अतिक्रमण ही रहिवाशांची मोठी डोकेदुखी आहे. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र बाजार निर्माण करण्याची गरज आहे. शिवाय दर पावसात हा भाग पाण्याखाली जात असल्याने रहिवाशांना मनस्ताप होत असतो.

सांडपाणी व्यवस्था आणि पिण्याचे पाणी या दोन महत्त्वाच्या समस्यांवर येणाऱ्या नगरसेवकांनी काम करणे गरजेचे आहे. शिवाय रस्त्यावर अनधिकृतरीत्या उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवरदेखील तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. निवडून येणाऱ्या नगरसेवकाने किमान महिन्यातून एकदा आपल्या प्रभागात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

– दत्तात्रय भट

महिला सबलीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु त्या सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचत नाहित. लोकप्रतिनिधींनी या योजनांची पूर्ण माहिती घेऊन त्याचा शहरातील महिलांना लाभ देण्याच्या दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. कुटुंबापासून दूर झालेल्या वरिष्ठ नागरिकांसाठीही महानगरपालिकेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

– स्वाती जोशी

*  भाईंदर पूर्व परिसरात येणारे प्रभाग – २, ३, ४, ५, १०, ११

* मतदारांची संख्या-१,५६,४९३

* पुरुष मतदार – ८६,६४४

* स्त्री मतदार – ६९,८४८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 3:40 am

Web Title: mbmc election 2017 mira bhayander municipal corporation election 2017
Next Stories
1 ऐन श्रावणात रंगलेली सायंकालीन खाद्यमैफल..
2 पालघर जिल्हानिर्मितीला तीन वर्षे पूर्ण; प्रश्न मात्र कायम
3 ऑक्सिटॉसिनयुक्त दुधाचा आरोग्याला फटका
Just Now!
X