मीरा-भाईंदर महापालिकेची ‘स्मार्ट’ सुविधा

वसई-विरार महापालिकेने स्मार्टफोनद्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा सुरू केली आणि त्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हेच पाऊल मीरा-भाईंदर महापालिकेनेही टाकले असून आता या शहरातील रहिवाशांनाही मोबाइलद्वारे मालमत्ता कर भरता येणार आहे. मीरा-भाईंदर महापालिकेने यापूर्वी संगणकावरून मालमत्ता कर भरण्याची सुविधा सुरू केली होती.

महापालिकेने विकसित केलेल्या स्वत:च्या  mbmc.gov.in संकेतस्थळावर गेल्यास त्यावर मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी आता घरी बसून संगणकाचा वापर करण्याची गरज शिल्लक राहिलेली नाही. हे संकेतस्थळ मोबाइलशीदेखील सुसंगत करून घेतले आहे. आपल्या मोबाइलच्या इंटरनेटच्या मदतीने या संकेतस्थळाला भेट दिली की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या साहाय्याने मालमत्ता कर भरता येणार आहे. ऑनलाइन कर भरण्यासाठी महापालिकेने इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय या दोन बँकांचे पेमेंट गेटवेचे पर्याय उपलब्ध करून दिले असून आणखी एका बँकेसोबत बोलणी सुरू आहेत. कराची रक्कम भरल्यानंतर सर्व तपशिलांसह त्याची पावतीदेखील देण्यात येते.

ऑनलाइन करभरणा प्रक्रियेत यापूर्वी सावळागोंधळ होता. अनेक वेळा मालमत्ता कराची साइट न उघडणे, कर भरला तरी त्याची पावती न मिळणे, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे वजा व्हायचे, परंतु ते पालिकेच्या तिजोरीत जमाच न होणे अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. मात्र आता या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या असून जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मालमत्ता करापाठोपाठ पाणीकराचा भरणादेखील मोबाइलद्वारे भरता येण्याच्या दिशेने महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.

अधिभार नाही

मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी मालमत्ता कराच्या एक टक्काएवढा अधिभार महापालिका नागरिकांकडून वसूल करत होती. सेवा देणाऱ्या अनेक खासगी कंपन्या देयकाची रक्कम ऑनलाइन भरल्यास ग्राहकांना देयकाच्या रकमेत सवलत देत असताना महापालिका मात्र ऑनलाइन भरणा करण्यासाठी नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र आता हा अधिभार काढून टाकण्यात आला आहे. कराचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी आता नागरिकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, अशी सुधारणा यात करण्यात आली आहे.