भाईंदर : मीरा-भाईंदर पालिकेच्या प्रभाग कार्यालय-६च्या इमारतीत नवीन पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गेले काही दिवस पत्रव्यवहार करूनही इमारत मोकळी होत नसल्याने पोलीस आयुक्तालयाचे काम रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मीरा रोडच्या रामनगर येथील प्रभाग क्रमांक ६ कार्यालयात पोलीस आयुक्तालय तर आरक्षण क्रमांक-२४९ येथे पोलीस उपायुक्त कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे.

सध्या येथे सुरू असलेल्या  उपनिबंधक सहकारी संस्था आणि महसूल विभागाचे मतदार नोंदणी आणि निवडणूक कामकाज कार्यालय भाईंदर पश्चिम ९० फुटी रस्त्यावरील शॉपिंग सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अभ्यासिका, सहदुय्यम निबंधक कार्यालय आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रलंबित आहे, परंतु १४ दिवस उलटले तरी अद्यापही आयुक्तालयाची जागा मोकळी होण्याच्या हालचाली नसल्याने कामाची रखडपट्टी सुरू आहे.आयुक्तालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर असे दोनदा जागा मोकळी करण्याविषयी पत्र संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

या संदर्भात दोनदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्यापही जागा मोकळी करून देण्यात आलेली नाही.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग