‘टीम द युवा’च्या माध्यमातून ४ लाख लोकांना जेवण, ८ हजार कुटुंबांना धान्य मदत

अंबरनाथ : करोनाच्या संकटात अंबरनाथमधील १७ ते २५ वयोगटातील तरुणांच्या‘ टीम द युवा’ या संस्थेने गेल्या ७५ दिवसांमध्ये ४ लाख मजुरांना जेवण, ८ हजार कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे संच, शंभरहून अधिकांना औषधांचे वाटप केले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रापासून ते थेट माळशेज घाटापर्यंतच्या आदिवासी बांधवांपर्यंत ही मदत पोहोचवण्यात आली आहे.

अंबरनाथच्या ‘टीम द युवा’च्या तरुणांनी अंबरनाथच्या पश्चिमेतील जावसई भागात असलेल्या महेंद्रनगर येथून मदतकार्य करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी समाजमाध्यमांवरून हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. त्यावर ठाणे जिल्ह्य़ातून जिथून फोन येईल तिथे वाहनांच्या माध्यमातून अन्न पोहोचवले जात होते. ठाणे जिल्ह्य़ातल्या मुंब्रा, कळवा, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा तालुक्यातील जवळपास ४ लाख व्यक्तींना या वाहनांच्या माध्यमातून जेवणाचा पुरवठा करण्यात आला आहे. पुढे मजुरांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे संच वाटण्याची सुरुवात झाली. त्यासाठी समाजमाध्यमांवर आवाहन केल्यानंतर १०० रुपयांपासून ते २५ हजारांपर्यंतची मदत उपलब्ध झाली. बँक कर्मचाऱ्यांचे गट, बँक ऑफ इंडियाची सिंधी सभा, इशा फाऊंडेशन, स्पंदन फाऊंडेशन, शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी यात आपली मदत दिल्याचे योगेश चलवादी सांगतो. परदेशातूनही सध्या मदत मिळत असल्याचेही योगेशने सांगितले आहे. चेतन गायकर यांनी आपल्या स्वत:च्या व्यवसायातील टेम्पो संस्थेला मदतीसाठी दिला. तर दत्ता गेजगे आणि नूर शेख यांनी रिक्षा व्यवसाय बंद असल्याने आपल्या रिक्षा धान्य वाटपासाठी देऊ  केल्या. गेल्या तीन महिन्यांपासून अशी मदत मिळत असल्याचे संस्थेचे सदस्य सांगतात. सध्याच्या घडीला अनेक गोष्टी सुरू झाल्याने जेवणाचा आणि अन्नधान्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र ग्रामीण भागात परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मोठा काळ जाणार असून त्या भागात यापुढेही काम करत राहणार असल्याचे योगेश चलवादी या तरुणाने सांगितले आहे. तर सध्या असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना घरपोच औषधेही पुरवली जात आहेत.

काळजी आणि खबरदारीही

‘टीम द युवा’च्या माध्यमातून गेल्या ७५ दिवसांपासून मदतकार्य सुरू आहे. मात्र या काळात मदतकार्यात सहभागी असलेल्या प्रत्येक सदस्याची दर १४ दिवसांनी सरकारी रुग्णालयात तपासणी केली जाते. मुखपट्टी, जंतुनाशक आणि सामाजिक अंतर पाळत काम केले जाते.