कल्याण-डोंबिवली महापालिकेत मलईदार खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगररचना विभागामध्ये वर्णी लावण्यासाठी काही अभियंत्यांनी मोठा ‘गोलमाल’ केला असल्याचे उघडकीस आले आहे. नगररचना विभागातील एका ‘मुरलेल्या’ अभियंत्यांने सामान्य प्रशासन विभागाला हाताशी धरून आयुक्तांच्या आशीर्वादाने काही अभियंत्यांना नगररचना विभागात रूजू करून घेतले असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे.
नगररचना विभागात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या एका अभियंत्याने आपल्याला नगररचना विभागात ठेवण्यात यावे यासाठी याच विभागातील ‘मुरलेल्या’ अभियंत्याला सांगितले होते. पण, वर्णीची ‘गणिते’ न जुळल्याने ‘या’ अभियंत्याला नगररचना विभागातून अन्य विभागात हलवण्यात आले. एका माजी आयुक्ताच्या खास मर्जीतल्या असलेल्या ‘या’ अभियंत्याने थेट आयुक्त मधुकर अर्दड यांच्या दालनात जाऊन आपले ‘गणित’ चुकल्याने कशी आपली नगररचना विभागातून बदली केली याचा अनुभव कथन केला. सामान्य प्रशासन विभागातील एका वादग्रस्त, बहुचर्चित अधिकाऱ्याने या सगळ्या प्रकरणांमध्ये ‘हात’ धुऊन घेतल्याची चर्चा आहे. या बहुचर्चित अधिकाऱ्याची ही सगळी नाटके आयुक्तांसह सर्व पक्षीय नगरसेवकांना कळली. त्यामुळे या अधिकाऱ्यावर अलिकडे झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली होती.
पाणीपुरवठा, बांधकाम विभागात अनेक वर्षे काम केलेले अनुभवी कनिष्ठ अभियंते नगररचना विभागात बदली करण्यात आले आहेत. या अभियंत्यांनी ताकद लावून नगररचना विभागात प्रवेश मिळवला असल्याची खमंग चर्चा पालिकेत सुरू आहे. नगररचना विभागात पदस्थापना मिळालेल्या अभियंत्यांमध्ये लिलाधर नारखेडे, सोमा राठोड, संजय आचवले, अनुप धुवाड, महेश डावरे यांचा समावेश आहे. ज्ञानेश्वर आडके, मच्छिंद्र हणचाटे, शशिम केदार, मनोज सांगळे, सचिन घुटे या कनिष्ठ अभियंत्यांच्या नगररचना विभागातून पाणीपुरवठा, बांधकाम विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून नगररचना विभागात ठाण मांडून असलेल्या सुभाष पाटील, सुरेंद्र टेंगळे यांना आयुक्तांनी ‘हात’ न लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘झोपु’ योजनेतील अभियंते बदलले
पालिकेच्या ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’ची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. असे असतानाही या योजनेतील अभियंते अनुप धुवाड, संजय आचवले या अभियंत्यांच्या ‘झोपु’ योजनेचे नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची कोणतीही परवानगी न घेता आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाने परस्पर बदल्या केल्याने खळबळ उडाली आहे. या बदल्यांच्या विषयी घरत यांनी नाराजी व्यक्त करून, हा विषय आयुक्त मधुकर अर्दड, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निदर्शनास आणला आहे. ‘झोपु’ योजनेची चौकशी ़सुरू असताना अशाप्रकारे अभियंत्यांच्या बदल्या करणे हे चौकशी यंत्रणा, न्यायालयाची दिशाभूल करण्यासारखे आहे, असे घरत यांनी या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.