सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : रेल्वे स्थानकाजवळील शहरातील एकमेव उड्डाणपुलावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बेलवली येथे नव्या उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, काटई-कर्जत रस्त्याला समांतर असलेल्या प्रस्तावित मेट्रो रेल्वेचे स्थानक तसेच रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या नियोजनामुळे उड्डाणपुलाचे काम अजूनही सुरू होऊ  शकलेले नाही. त्यामुळे नव्या उड्डाणपुलाची आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बदलापूर शहराची लोकसंख्या जशी वाढत आहे, तशी शहरातील रस्त्यांवरची कोंडीही वाढली आहे. शहरात पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळ एकमेव उड्डाणपूल आहे, तर बेलवली भागात रेल्वे रूळाखालून भुयारी मार्ग जात आहे. मात्र, या भुयारी मार्गाचा आराखडा चुकल्याने येथे कायम पाणी साचते. त्यामुळे वाहनचालक शहरातल्या उड्डाणपुलाचाच पर्याय निवडतात. परिणामी उड्डाणपुलावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. शहराच्या पूर्व भागात उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरच कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्यालय, पालिकेचे दुबे रुग्णालय आणि काही अंतरावर आदर्श शाळा व महाविद्यालय आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. पश्चिमेला उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरच चौक, महावितरण कार्यालय आणि रुग्णालय असल्याने येथेही वाहने वळण घेत असताना कोंडी होते. अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर झालेल्या वाहनांच्या कोंडीमुळे उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागतात. ही कोंडी फोडण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावर वडवली तलाव ते पूर्वेतील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयापर्यंत रेल्वे मार्गिकेवरून उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने या पुलासाठी निधीही मंजूर केला होता. मात्र, याच काळात बदलापूर मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी झालेल्या सर्वेक्षणात बदलापूर पूर्व भागात काटई-कर्जत राज्यमार्गावर उड्डाणपुलाच्या जागेवर चिखलोली मेट्रो स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर या मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. रेल्वे आणि मेट्रो रेल्वेच्या कामासाठी या उड्डाणपुलाचा आराखडा बदलण्याची वेळ आल्याची माहिती एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी दिली आहे. उड्डाणपुलाचा नवा आरखडा तयार करण्यात आला असून तांत्रिक मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनाकडे आराखडा पाठवण्यात आल्याचेही एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी सांगितले.

चिखलोलीसाठीही उड्डाणपूल फायदेशीर

अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मधोमध होऊ  घातलेल्या चिखलोली स्थानकामुळे या भागात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत. मात्र चिखलोली पूर्व आणि पश्चिम भागांत ये-जा करण्यासाठी बेलवलीचा भुयारी मार्ग किंवा अडीच किलोमीटरवर असलेल्या फॉरेस्ट नाका येथील जोडरस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे चिखलोलीसाठीही हा उड्डाणपूल फायदेशीर ठरणार आहे.