21 October 2018

News Flash

विस्तारित ठाण्याला ‘मेट्रो’बळ

घोडबंदरच्या बांधकाम क्षेत्राचा भाईंदरपाडय़ापर्यंत विस्तार

प्रतिनिधिक छायाचित्र

घोडबंदरच्या बांधकाम क्षेत्राचा भाईंदरपाडय़ापर्यंत विस्तार; घरांचे भाव वधारले

वडाळा ते कासारवडवली (ठाणे) दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचा घोडबंदर मार्गावरील गायमुखपर्यंत विस्तार करण्याची ठाणे महापालिकेची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्य केली आहे. त्यामुळे घोडबंदरमधील रहिवाशांना जलद वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या पाश्र्वभूमीवर विस्तारित ठाणे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पट्टय़ातील बांधकाम क्षेत्राला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. घोडबंदर मार्गाच्या परिसरातील बांधकाम क्षेत्र आता गायमुख, ओवळा आणि भाईंदरपाडय़ापर्यंत विस्तारू लागले असून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ५०० चौरस फुटाच्या घरांना ६० लाखांचा भाव आला आहे. बांधकाम व्यावसायिकांतही समाधानाचे वातावरण आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १४४व्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. मेट्रो प्रकल्प ४ अचा विस्तार आता गायमुखपर्यंत केला जाणार असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. मुंबई-ठाणे-मीरा-भाईंदर ही शहरे आणखी जवळ येणार आहेत. घोडबंदर मार्गावरील कोंडीवर हा उतारा असल्याचे स्पष्ट होत आहे.

घोडबंदर आणि दिवा-शीळ पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. कासारवडवलीच्या पलीकडे नागरीकरणाचा वेग मोठा आहे. पालिकेने या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविला असून रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामेही आगामी काळात केली जाणार आहेत. ओवळा, भाईंदरपाडा, गायमुखपर्यंत नागरी संकुलांचे इमले उभे राहात असताना मेट्रोचा मार्ग गायमुखपर्यंत नेला जावा, अशा सूचना ठाणे महापालिकेमार्फत एमएमआरडीएला यापूर्वीच करण्यात आल्या होत्या. भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांच्या बांधकाम कंपनीची विशेष नागरी वसाहत याच विस्तारित ठाण्यात उभी राहात असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप तसेच गोदरेज कंपनीच्या बडय़ा गृहप्रकल्पांची पायाभरणी या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे येथील लोकसंख्येत दीड ते दोन लाखांची भर पडण्याची शक्यता आहे. मेट्रोमुळे या प्रकल्पांना संजीवनी मिळणार असून ओवळा भागात कारशेडची उभारणी होत असल्याने हे विस्तारीकरण एमएमआरडीएला सोयीचे ठरेल, असा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचा विस्तार गायमुखपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याने ठाण्याच्या विकासाला वेग मिळू शकणार आहे. भाईंदरपाडा, ओवळा, गायमुख पट्टय़ातील प्रवाशांना मेट्रोसाठी कासारवडवलीपर्यंत पायपीट करावी लागणार होती. या निर्णयामुळे नव्या ठाण्यात राहण्यास येणाऱ्या रहिवाशांना घरापर्यंत ही सेवा मिळू शकेल. भविष्यात दहिसर-भाईंदपर्यंत येणारा मेट्रो मार्ग गायमुख मेट्रोला जोडता येऊ शकेल. मुंबईतील मध्य उपनगरे, ठाणे आणि पश्चिम उपनगराला जोडणारे मेट्रो मार्गाचे वर्तुळ या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात येऊ शकेल.           – संजीव जयस्वाल, आयुक्त ठाणे महापालिका

मेट्रो ४ अ

  • कासारवडवली ते गायमुख
  • विस्तारित मार्ग २.७ किमी
  • अंदाजे खर्च ९४९ कोटी
  • स्थानके- गोवणीवाडा, गायमुख
  • प्रकल्प पूर्तता मार्च २०२२

First Published on January 13, 2018 3:33 am

Web Title: metro rail project in thane