News Flash

मनसे नेते अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस, संताप व्यक्त करत म्हणाले, “कोणतंही आंदोलन मी ….”

आंदोलन सुरु असतानाच अविनाश जाधव यांनी तडीपारीची नोटीस

संग्रहित (फेसबुक)

मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुकला व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वसई पालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

अविनाश जाधव ठाण्यामध्ये महापालिकेबाहेर कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी आंदोलन करत असतानाच ही नोटीस बजावण्यात आली. यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. “मी गेली अनेक वर्ष सातत्याने लोकांसाठी आंदोलन करतोय. कोणतंही आंदोलन मी स्वत:साठी केलेलं नाही. वसईतही जे आंदोलन केलं होतं ते कोविड सेंटरसाठी केलं होतं. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे. मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून मला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“ठाण्यात एवढे गुंड आहेत ते हद्दपार होत नाहीत. मी लोकांसाठी सातत्याने भांडत असतानाही मला तडीपारीची नोटीस पाठवली. लोकांसाठी कोणी भांडायचं नाही का? माझी पहिली सभा झाली तेव्हा मला एक कोटींचा दंड लावला होता. त्याचदिवशी मला तडीपारीच्या नोटीस येतील असं म्हटलं होतं. लोकांचं काम करतो, समस्या सोडवतोय म्हणून मला हे महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं बक्षीस आहे,” अशा शब्दांत अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.

“मी कोकणासाठी ज्या १०० बसेस सोडणार आहे त्याचं मिळालेलं हे बक्षीस आहे. अनेक पोलिसांचं बिल कमी करण्यासाठी रुग्णालयाबाहेर जाऊन जे आंदोलन केलं त्याचं महाराष्ट्र सरकारने दिलेलं हे बक्षीस आहे. याच्यापुढे लोकांची काम करायची की नाही ? रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवावं,” असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:49 pm

Web Title: mns leader avinash jadhav tadipar notice thane maharashtra sgy 87
Next Stories
1 पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार ?
2 अतिसंक्रमित क्षेत्रे घटणार?
3 वाढीव उपचार बिलांचा परतावा
Just Now!
X