एकदिवसीय सहलीतून ‘पंचवटी दर्शन’

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत ‘नाशिक पॅटर्न’चा ढोल बडवूनही सपाटून मार खाल्लेल्या मनसेने ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीही पुन्हा नाशिकमधील आपल्या कामगिरीचा प्रभाव पाडण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिकमधील आपल्या विकासकामांची चित्रफीत दाखवण्यासोबतच मतदारांना प्रत्यक्ष नाशिक दाखवण्यासाठी एकदिवसीय ‘पंचवटी दर्शन’ सहलीचे आयोजनही करण्यात येत आहे.

ठाणे शहरात निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्व पक्षीयांचे काही ना काही उपक्रम सुरू आहेत. विकासकामे, आंदोलने यांच्या माध्यमातून मतदारांवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न पक्षीय प्रतिनिधी करत आहेत. यात मनसेही मागे नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मनसेने दिवा परिसरावर लक्ष केंद्रित केले असून तेथे सांस्कृतिक कार्यक्रम, आंदोलने करण्यात येत आहेत. मध्यंतरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दिवा भागाचा दौरा केला होता. आता यापुढे एक पाऊल टाकत मनसेने नाशिक महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर पक्षाने केलेल्या विकासकामांची जाहिरात करण्याचे ठरवले आहे. यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय नाशिक सहलीचे आयोजन केले आहे. नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचे दर्शन घडविण्यासाठी येत्या रविवारी ८ जानेवारीला ठाण्यातून बसेस नाशिकला रवाना होणार आहेत. या वेळी नागरिकांना विकासकामे दाखविली जाणार आहेत.

कल्याण, डोंबिवलीत अपयश

नाशिकमध्ये सत्ता हातात आल्यावर मनसेने तेथे काय केले याचे सादरीकरण करीत राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ता देण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते. मात्र, हा पॅटर्न फसला. ठाण्यात हा पॅटर्न फसू नये, यासाठी आता पक्षाने मतदारांना ‘पंचवटी दर्शन’ घडवण्याचे ठरवले आहे.

येत्या रविवारी आम्ही ठाण्यातून २८ बसेस नाशिकला पाठविणार आहोत. नाशिकमध्ये कशा स्वरूपाची विकासकामे केली गेली आहेत, हे प्रत्यक्ष नागरिकांना दाखविले जाणार आहेत. यामध्ये नव्याने बांधलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, तलाव, रस्ते, चौक, नदीवरील घाट, बालोद्यान असे विविध प्रकल्प दाखविले जाणार आहेत.

अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष