घरपोच सेवेची भुरळ दिवसेंदिवस वाढत असून आता ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयानेही वाचन संस्कृतीचा परिघ रुंदाविण्यासाठी या मार्गाचा अवलंब सुरू केला आहे. त्यांच्या ‘ग्रंथयान’ या फिरत्या ग्रंथालयास वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
या उपक्रमामुळे ग्रंथसंग्रहालयाच्या वाचन संख्येमध्ये एका वर्षांत सुमारे एक हजारांची भर पडली असून त्यामुळे ग्रंथालयाच्या एकूण सदस्य संख्येतही भरघोस वाढ झाल्याचे ग्रंथालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे शहरातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले ग्रंथसंग्रहालयाचे फिरते वाचनालय आपल्याही सोसायटीमध्ये यावे यासाठी नवे वाचक आणखी सदस्य तयार करत असून त्यांच्या प्रयत्नामुळे अवघ्या एका वर्षांत एवढी मोठी मजल गाठण्यात आली असल्याची माहिती, संस्थेच्या कार्यवाहक विद्याधर ठाणेकर यांनी सांगितले.
पुस्तके खरेदी करून वाचण्यापेक्षा ग्रंथसंग्रहालयातून पुस्तके आणून वाचणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. मात्र जेष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि इतर वाचकही ग्रंथालय दुर असल्याने त्याकडे फिरकणे टाळत होते. त्यांच्याशी ग्रंथालयाची नाळ जोडण्यासाठी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाने ग्रंथयान ही सुविधा सुरू केली. १ जुलै रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाला अवघ्या १५ दिवसांमध्ये शंभर सदस्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्याला ही नोंदणी वाढत जाऊन वर्षांकाठी सुमारे एक हजार वाचकांचा आकडा ग्रंथायनने ओळांडला आहे. ग्रंथयान हा ग्रंथसंग्रहालयाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून या ग्रंथयानची संख्या वाढवण्याचा प्रयत्न ग्रंथालय भविष्यकाळात करीत आहे.