इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे महत्त्व वेळीच ओळखून २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींनी या माध्यमांचा पुरेपूर वापर करून घेतला. त्यामुळे  माध्यमांनी आपले महत्त्व वेळीच ओळखून स्वतचा इतरांकडून होणारा वापर तातडीने थांबवला पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी व्यक्त केले. यू.जी.सी. व आदर्श महाविद्यालय आयोजित ‘भारतीय माध्यमांची भूमिका – वसाहतिक ते समकालीन कालखंड’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
आदर्श महाविद्यालयात पार पडलेल्या या परिषदेत झारखंड, गोवा, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व राज्यातून आलेल्या २८ प्राध्यापकांनी या वेळी प्रबंध वाचन केले. तसेच माध्यमांशी निगडित दोन परिसंवाद व व्याख्यानेदेखील येथे झाली. यात स्थानिक पत्रकारही सहभागी झाले होते, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांनी दिली. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व ‘लोकसत्ता’चे माजी संपादक अरुण टिकेकर यांनी केले. प्रकाश बाळ यांनी आपली भूमिका विशद करताना सांगितले की, माध्यमांचे सध्याचे काम पाहता ते एखाद्या भक्ष्याच्या शोधात असल्यासारखी पत्रकारिता करत आहेत. ही आदर्श पत्रकारिता नव्हे. जाहिराती आणि या माध्यमांचे सख्य असल्याने आज कोटय़वधींची उलाढाल या माध्यमांकडून होत आहे. अण्णा हजारेंचे रामलीला मैदानावरील आंदोलन प्रक्षेपित करताना जाहिरातींना फार कमी वेळ दिला होता. त्यामुळे या आंदोलनादरम्यान ६२५ कोटींच्या महसुलाला त्यांना मुकावे लागले होते.