जर आपण एखाद्या पोलिसाची तक्रार केली तर काय होऊ शकते? याचा धक्कादायक प्रत्यय ठाण्यातील युवकाला आला. मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलिसाने युवकाच्या अंगावर वाहन घातल्याचा प्रकार पाचपाखाडी भागात घडला. सतर्क असल्यामुळे युवक वाचला. पण, काही अंतर तो कारच्या बोनेटला पकडून जमीनीवर फरफटला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्माचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढा धक्कादायक प्रकार भर रस्त्यावर होऊनही आरोपीला अजूनही अटक झालेली नाही.
#WATCH: Mumbai constable Ramesh Awate trying to run man over with his car after argument over money in Thane, Awate is on the run. (21/04) pic.twitter.com/Yoo6Q0UMfQ
— ANI (@ANI) May 2, 2017
आईस्क्रीमचा व्यवसाय करणारा अतुल पेठे आणि पोलिस कर्मचारी रमेश आवटे यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता. दोघांतील वादानंतर अतुलने रमेश आवटे विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली होती. आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याच्या रागातून पोलीस कर्मचारी असणाऱ्या रमेशने अतुलच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पाचपाखाडी भागात घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अतुलने नौपाडा पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस कर्मचारी रमेश आवटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.