ठाणे : गेल्या काही आठवडय़ांपासून ठाणे, नवी मुंबईसह महामुंबईच्या वाहनकोंडीस जबाबदार ठरलेल्या मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम १० सप्टेंबपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यात दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मुंब्रा बाह्य़वळण रस्तादुरुस्ती तसेच एकूणच ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडीबाबत चर्चा झाली.

ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस हजर होते. मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कोणत्याही परिस्थितीत १० सप्टेंबपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश या वेळी पालकमंत्र्यांनी दिले. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली यांसारख्या महापालिका हद्दीतील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडी मिक्स वगैरेंसारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, असेही या बैठकीत ठरले. पोलिसांना मदत करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून १०० वाहतूक वॉर्डन दिले जावेत, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे पनवेलचे अभियंता आर. एस. पाटील यांनी या वेळी १० सप्टेंबपर्यंत वळण रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा केला. या रस्त्यालगत राहणाऱ्या काही कुटुंबांना ठाणे पालिकेने पर्यायी तात्पुरती निवासव्यवस्था करूनही ती कुटुंबे तेथून स्थलांतरित झालेली नाहीत. त्यामुळे दुरुस्तीला उशीर होतो आहे, असे पाटील यांनी सांगितले. पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबे हलविण्याची व्यवस्था करू असे सांगितले. गेमन चौक येथील दुरुस्तीदेखील तितकीच महत्त्वाची असून पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून २५ ऑगस्टपर्यंत ही दुरुस्ती पूर्ण झाली पाहिजे असे निर्देशही दिले.

वाहतुकीवर नियंत्रण

या वेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भिवंडी येथील गोदामांमुळे वाढलेल्या वाहतुकीस नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे बराच प्रश्न सुटेल असे सांगितले. तेथील प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी भिवंडीतील वाहतूक ट्रक्स संघटनांशी बोलून त्या भागातील वाहतूक नियंत्रित करावी तसेच अवजड व जड वाहनांचे वेळापत्रक निश्चित करावे असे सांगितले. या वेळी उरण-जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित करण्याच्या सूचना होत्या. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तसेच संबंधितांशी बोलण्यात येऊन तत्काळ सूचना देण्यात येतील असेही ते म्हणाले. जड अवजड वाहनांसाठी अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पोलीस कार्यवाही करतील असेही ठरले.

नोडल अधिकारी नियुक्ती

जिल्ह्यतील वाहतूक कोंडीबाबत सर्व संबंधित यंत्रणांसमवेत समन्वय साधण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील हे समन्वय अधिकारी असतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वाहतूक कोंडीचे प्रश्न सोडविताना अडचणी आल्यास या दोघांशी यंत्रणांनी संपर्क साधावा असे ते म्हणाले. प्रवासी संघटना, टॅक्सी संघटना, ओला, उबेर यांचा सहभाग असलेली वाहतूक सल्लागार समिती नेमण्याचे ठरविण्यात येईल असेही ते म्हणाले.

‘एफएम’ची मदत घेणार

प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी वाहतूक कोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे, तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूक कोंडी किंवा रस्तेदुरुस्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे, अशी सूचना केली. यावर पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी एफएम रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून ठाणे आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण कक्ष अशी माहिती पुरवीत राहील, अशी व्यवस्था करण्याचे मान्य केले.