‘का नसेन’च्या निमित्ताने आत्तापर्यंत अनेक रेकॉर्ड संग्राहकांना भेटण्याचा योग आला. सगळेच अगदी मनमोकळेपणाने बोलणारे आणि गाण्यांप्रमाणेच गप्पांचीही मैफल जमवणारे! डोंबिवलीच्या विजय रामचंद्र कामत यांना भेटूनही असाच अनुभव आला. वेगवेगळ्या ‘उपमा’ वापरून बोलणं रंजक करण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यांचं नर्मविनोदी बोलणं आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व यामुळे आमच्या गप्पा तर छान रंगल्याच, शिवाय ते स्वत: उत्तम गायक असल्याने आमचं बोलणं म्हणजे शब्दश: गप्पांची ‘मैफल’ होती!

कामतकाका इलेक्ट्रिकल इंजिनीयर आहेत. बी.एम.सी.मधून ते साहाय्यक अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. गाण्याचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांची आजी गात असे. वडील संगीताचे जाणकार होते, ते स्वत: पोवाडे रचून गात असत, कार्यक्रम करीत असत. ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली, तेव्हा काकांच्या घरी रेडिओ होता. त्यांचे वडील, मोठे बंधू साडेसात वाजता घरी हजर असत. आईसुद्धा स्वयंपाक वगैरे आवरून त्यांच्यात सामील होत असे. रेडिओ सिलोनशिवाय आपली आवड, कामगार सभा, भावसरगम वगैरे रेडिओवरचे कार्यक्रम ते आवर्जून ऐकत असत. त्यांच्या मोठय़ा बंधूंकडे तेव्हा रेकॉर्ड प्लेयरही होता. या सगळ्या गोष्टींमुळे कामत काकांच्याही मनात जुन्या गाण्यांची आवड निर्माण झाली. नोकरी लागल्यावर पहिल्या पगारात रेकॉर्ड्स आणायच्या हे त्यांनी ठरवलेलं होतं. त्यांनी आधी रेकॉर्ड्स विकत घेतल्या आणि मग रेकॉर्ड प्लेयर घेतला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘आधी साडय़ा घेतल्या आणि मग नवरी शोधली!’ दर शुक्रवारी सकाळी सहा-साडेसहाला घरातून निघून चोरबाजारात जायचं आणि इतर कुणीही रेकॉर्ड्स घ्यायच्या आधी आपल्याला हव्या त्या रेकॉर्ड्स शोधायच्या असा त्यांचा कार्यक्रम असे.
एकेका गाण्यासाठी ते वणवण फिरले आहेत. आता इंटरनेटवर एका ‘क्लिक’सरशी हवं ते मिळू शकतं. त्यामुळे त्यात फारशी मजा नाही असं त्यांना वाटतं! पुन्हा एकदा त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘केशर मुबलक मिळत नाही म्हणून त्याची किंमत! ते जर भरपूर मिळायला लागलं तर त्याचं अप्रूप वाटणार नाही!’ काकांनी १९८० पासून रेकॉर्ड संग्रह करायला सुरुवात केली. दर महिन्याला ठरावीक रक्कम बाजूला काढून ते त्यातून रेकॉर्ड्स विकत घ्यायचे. त्यांच्याकडे इक्बाल कुरेशी, ए.आर. कुरेशी, एस. मदन, बिपिन बाबुल, एस. मोहिंदर, सरदार मलिक अशा अनवट संगीतकारांची गाणी आहेत. काकांना मराठी गाण्यांची आवड आहे पण त्यांचा जास्त ओढा मात्र हिंदी गाण्यांकडे आहे. रेकॉर्ड्सचा उत्तम संग्रह, आनंदी वृत्ती, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि सद्गुरू मामा देशपांडे यांचा मिळालेला अनुग्रह या सगळ्यामुळे कामतकाका निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अत्यंत समाधानी आहेत!