24 September 2020

News Flash

आयुक्तांचा राबता.. तरीही उद्यानाची दुरवस्था

माजीवडा गाव येथे ठाणे महानगरपालिकेने नागरी संशोधन केंद्राची प्रशस्त अशी इमारत बांधली आहे.

उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने व्यायामाच्या या साहित्यांची दुर्दशा झालेली आहे.

नागरी संशोधन केंद्रालगतच्या उद्यानाकडे पालिकेचे दुर्लक्ष

ठाणे महापालिकेतील खास बैठकांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या माजीवडा गाव परिसरातील नागरी संशोधन केंद्राच्या इमारतीसमोर असलेल्या नाना-नानी उद्यानाची अवस्था अत्यंत बिकट बनली असून या दुरवस्थेकडे दररोज बैठकीसाठी या ठिकाणी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ठाणे परिसरात मोठय़ा उद्यानांची आखणी करत महापालिका प्रशासनाने ‘हिरवं ठाणे’ ही संकल्पना रुजविण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरापासून युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. असे असताना महापालिका इमारतीसमोरील उद्यानाचीच दुरवस्था झाली असल्याने नागरिकांत नाराजी आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल हे या ठिकाणी वरचेवर येत असतात. परंतु त्यांचेही या उद्यानाकडे लक्ष गेलेले नाही.

माजीवडा गाव येथे ठाणे महानगरपालिकेने नागरी संशोधन केंद्राची प्रशस्त अशी इमारत बांधली आहे. या केंद्राला लागूनच महापालिकेने काही वर्षांपूर्वी अद्ययावत असे उद्यान उभारले आहे. या उद्यानात खुल्या व्यायामशाळेचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र येथील उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने व्यायामाच्या या साहित्यांची दुर्दशा झालेली आहे. जवळपास सर्व साहित्याची मोडतोड करण्यात आली असून काही चोरीस गेले आहे. या उद्यानाच्या फलकावरील नाव आणि सूचनेतील अनेक अक्षरे गायब आहेत. या परिसरात फारशी वर्दळ नसल्याने या ठिकाणी तरुण-तरुणींचे अश्लील चाळेही सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. आर. ए. राजीव यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या नागरी संशोधन केंद्राच्या इमारतीत नेहमीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची ये-जा सुरू असते. विद्यमान आयुक्त संजीव जयस्वाल हेदेखील या नागरी संशोधन केंद्रात वरचेवर जात असतात. मात्र या अधिकाऱ्यांचेही उद्यानाकडे लक्ष गेलेले नाही.

पालिकेच्या इमारतीत खास बैठकांसाठी सुरक्षारक्षकांचे विशेष पथक तैनात करणाऱ्या महापालिकेस या उद्यानात एखादा सुरक्षारक्षक ठेवणे का जमत नाही, असा सवाल रहिवाशी उपस्थित करत आहेत. याच उद्यानात रात्रीच्या वेळी येथे मद्यपींचा वावर असतो तसेच पाटर्य़ाही केल्या जातात, असा आरोप माजीवडा ज्येष्ठ नागरिक संघटनेने केला आहे. व्यायामाची तुटलेली साहित्ये, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारण्यात आलेली सदोष गटार यंत्रणा पुरेशा प्रमाणात असलेला बाकडय़ांचा अभाव यामुळे हे उद्यान बकाल अवस्थेत आहे. यामुळे येथील रहिवाशी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:19 am

Web Title: nana nani park in majiwada village in bad condition
Next Stories
1 गोंगाट कुणाचा.. शिवसेनेचा!
2 जखमी गोविंदा तीन वर्षांनी चालू लागला
3 मीरा-भाईंदरच्या विकासाचे ‘संकल्पचित्र’
Just Now!
X