News Flash

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादीकडून विरोधात अर्ज नाही; घोषणेची औपचारिकता शिल्लक

ठाणे महापालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांनी महापौर तर शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम यांनी उपमहापौर पदासाठी शनिवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळेस शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने महापौर पदावर म्हस्के यांची तर उपमहापौर पदावर कदम यांची बिनविरोध निवड झाली असून येत्या २१ नोव्हेंबरला दोघांच्या निवडीची घोषणा केली जाईल.

ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या २१ नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे. या पदासाठी शनिवारी दुपापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. शनिवारी दुपारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महापालिका मुख्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये महापौर पदासाठी नरेश म्हस्के यांचे नाव निश्चित करण्यात आले. या दोघांचे अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे यांनी महापालिका विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांची भेट घेतली.

शिवसेनेत नाराजी..

ठाणे महापालिका महापौर पदासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के आणि ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांची नावे आघाडीवर होती. त्यापैकी म्हस्के यांची महापौर पदावर वर्णी लागली आहे. मात्र, महापौर पद देण्यात आले नाही म्हणून देवराम यांचे पुत्र ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी महापालिका मुख्यालयात नाराजी व्यक्त केली. तीन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकांच्या काळात भोईर कुटुंबीयांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. महापौर पद देण्याच्या अटीवर त्यांनी प्रवेश केल्याचे भोईर कुटुंबीयांचे म्हणणे होते. आताचे महापौर पद मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळेस त्यांना डावलण्यात आल्याने संजय भोईर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

नव्या समीकरणाचे दर्शन.. : ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असून या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचे महापौर होणार, हे स्पष्ट होते. असे असले तरी या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते कार्यालयात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी उदयास येत आहे. या आघाडीचा दाखला देऊन शिंदे यांनी अर्ज दाखल करू नका, अशी विनंती शिंदे यांनी केली होती. त्यानंतरच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:37 am

Web Title: naresh mhaske of the shiv sena as mayor of thane abn 97
Next Stories
1 मेडिकलच्या विद्यार्थिनीच्या रॅगिंगप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल
2 वाहनचालकांच्या बेशिस्तीला ब्रेक
3 ठाण्याचा महापौर कोण?
Just Now!
X