20 September 2020

News Flash

नैसर्गिक रंग उधळू चला..

अवघ्या चार दिवसांवर आलेल्या धुळवडीसाठी आबालवृद्ध सज्ज होत असताना होळीतील रंगांत होणारा रसायनांचा वापर पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनला आहे.

| March 3, 2015 12:28 pm

अवघ्या चार दिवसांवर आलेल्या धुळवडीसाठी आबालवृद्ध सज्ज होत असताना होळीतील रंगांत होणारा रसायनांचा वापर पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनला आहे. या पाश्र्वभूमीवर नैसर्गिक रंगानेही तितकीच ‘रंगतदार’ धुळवड साजरी करता येते, हे दाखवण्यासाठी ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंचने पालक, कोथिंबीर, पुदिना, बीट, हळद, मेंदी, कांद्याची साल अशा भाज्यांपासून रंग बनवण्याची कार्यशाळाच आयोजित केली आहे.
धुलिवंदनाच्या पाश्र्वभूमीवर बाजारात वेगवेगळय़ा प्रकारचे रंग उपलब्ध झाले असले तरी यातील बहुतांश रंग रासायनिक प्रक्रिया करून बनवलेले असतात. असे रंग डोळय़ांत, तोंडात गेल्याने त्रास होण्याची शक्यता असते. तसेच अशा रंगामुळे केस आणि त्वचेवरील विपरित परिणाम होण्याची भीती असते. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंगांच्या वापरासाठी वेगवेगळय़ा सामाजिक संस्था व राज्य सरकारतर्फे जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण दक्षता मंचने सोमवारी ठाण्यातील बेडेकर विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.   
पालक, कोथिंबिर, पुदीना, बीट, हळद, मेंदी, कांद्याची साल, पळसाची पाने, पारिजाताच्या फुलांचे देठ, कात आदी गोष्टींचा वापर करुन नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेतून देण्यात आले.  हे पदार्थ बारीक चिरून पाण्यात मिसळले की विविध रंग तयार करता येतात. तसेच कोरडे रंग तयार करण्यासाठी हे सर्व पदार्थ सावलीत सुकवुन त्याची पावडर केली जाते. ती पावडर बेसन किंवा तांदळाच्या पीठात मिसळवून घरच्या घरी रंग तयार करू शकतो, असे दक्षता मंचच्या सदस्यांनी कार्यशाळेत सांगितले. पर्यावरण दक्षता मंचतर्फे तयार करण्यात आलेले नैसर्गिक रंग दादोजी कोंडदेव गाळा नं.१५ येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. संपर्क २५३८०६४८
असे बनवा घरच्या घरी रंग.
* लाल रंग बनवण्यासाठी : रक्तचंदनाची भुकटी कोरडा रंग म्हणून वापरता येते. तसेच एक लिटर पाण्यात दोन चमचे रक्तचंदनाची भुकटी टाकून ते पाणी उकळल्यास ओला लाल रंग बनवता येतो. याशिवाय डाळिंबाच्या साली पाण्यात उकळवूनही लाल रंग बनवता येतो.
* हिरव्या रंगासाठी : मेंदी पावडर कणकेत मिसळून कोरडा हिरवा रंग बनवता येतो. हे मिश्रण पाण्यात मिसळून लावल्यास लाल रंग तयार होतो. तर त्यात आवळय़ाची पावडर मिसळल्यास भुरकट रंग मिळतो. ओला हिरवा रंग तयार करण्यासाठी पाने चिरुन-वाटून पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळवावीत.
* पिवळा रंग तयार करण्यासाठी: चार चमचे चण्याच्या डाळीच्या पिठात दोन चमचे हळद पावडर मिसळून कोरडा पिवळा रंग तयार करता येतो. ओला पिवळा रंग तयार करण्यासाठी दोन चमचे हळदीची पावडर दोन लिटर पाण्यात टाकून चांगल्या प्रकारे उकळल्यास गर्द पिवळा रंग बनतो किंवा अमलतास, झेंडू यांसारखी पिवळी फुले रात्री पाण्यात भिजवून सकाळी उकळल्यावर पिवळा रंग बनतो.
* जांभळा रंग तयार करण्यासाठी बीट पाण्यात उकळवून वाटल्यास उत्तम जांभळा रंग बनतो.
* काळ्या रंगासाठी आवळा चूर्ण लोखंडाच्या भांडय़ात रात्रभर भिजवल्याने काळा रंग बनतो.
शलाका सरफरे, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:28 pm

Web Title: natural color to use for holi
टॅग Holi
Next Stories
1 तीन दिवसांत साडेतीन कोटी रुपयांच्या तांदळाची विक्री
2 मुजोर रिक्षाचालकांचा धंदा ‘बस’ला
3 ठाणे शहरबात : ठाण्यापल्याड प्रभू प्रमाद!
Just Now!
X