काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना अखेर आघाडी झालीच नाही तर दिव्यातील सर्व ११ प्रभागांसाठी उमेदवार कुठून आणायचे, असा प्रश्न राष्ट्रवादीला पडला आहे.   ठाण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीबाबत सकारात्मक आहेत, तरीही मुंब्य्रातील जागेवरून अद्यापही आघाडी झालेली नाही. कळवा आणि मुंब्रा या दोन्ही भागात काँग्रेसची अतिरिक्त जागांची मागणी आहे; मात्र कळव्यातील केवळ एक जागा काँग्रेसला आणि मुंब्रा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने तेथील २० जागा या राष्ट्रवादीला द्याव्यात, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.

[jwplayer yjVz9K5y]

आघाडीबद्दल अद्याप तोडगा निघाला नसल्याने पक्षाने इच्छुक उमेदवारांची यादी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाला उमेदवारांची नावे कळवायची असल्याने राष्ट्रवादीने उमेदवारांसाठी संपूर्ण दिवा परिसर पिंजून काढल्याचे दिसत आहे.

प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मधून आठ उमेदवार आणि प्रभाग क्रमांक २९ मधून तीन उमेदवारांची नावे पक्षाने जिल्हा प्रशासनाला कळवली आहेत. आगासन, बेतवडे, दातिवली, दिवा, साबे, बी. आर. नगर, बेडेकर नगर या भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार सुभाष भोईर यांनी आव्हाड यांच्याशी सूत न जुळल्याने आमदारकीचा राजीनामा देत २०१२ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ साली ते कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. त्यामुळे दिव्यात शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी आता भोईर यांच्यासह स्थानिक नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरूआहेत.दिव्यात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही; मात्र आता सर्वच राजकीय पक्षांना दिव्यातील रहिवाशांच्या हालअपेष्टांचा पुळका आल्याने त्या सुरात राष्ट्रवादीनेही सूर मिसळण्यास सुरुवात केली आहे.

आव्हाड यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी

मुंब्रा परिसर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो; परंतु दिव्यात राष्ट्रवादीला उमेदवार मिळविताना अनेक जणांना मिनतवाऱ्या कराव्या लागल्याचे राष्ट्रवादीतील एका गटाने सांगितले. मुंब्य्राजवळील प्रभाग क्रमांक २९ मधील खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, कौसा या परिसरात जीतेंद्र आव्हाड यांच्या गळ्यातील ताईत मानले जाणारे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले हिरा पाटील यांचा प्रभाव असून या भागातून उमेदवार मिळविण्यास राष्ट्रवादीला कठीण गेले नाही; परंतु प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच आव्हाड यांच्या कामावर नाराज असल्याचे चित्र आहे. आव्हाड यांचा मुंब्य्रातील ठरावीक समाजाकडे ओढा असल्याने दिव्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

[jwplayer w5DlsZoi]