राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेला विविध राजकीय पक्षांकडून मोठा विरोध होण्यास सुरुवात झाली असून कळवा तसेच मुंब्रा परिसरात मोठय़ा लोकसंख्येचे प्रभाग निश्चित करण्यात आल्याने सत्ताधारी शिवसेनेचे हितसंबंध जपण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. मूळ शहरातील काही प्रभाग कमी झाल्याने भाजपच्या गोटात नाराजी व्यक्त होत असताना राष्ट्रवादीनेही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत.

प्रभाग रचना अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच पालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांच्या हाती कशी लागली, असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला. काही वरिष्ठ पालिका अधिकारी सध्या हिटलरच्या भूमिकेत वावरत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांनीच निकटवर्तीय नगरसेवकांना प्रभाग रचनेची इत्थंभूत माहिती दिली आणि गोपीनियतेचा भंग केल्याचा आरोपही परांजपे यांनी केला. याप्रकरणाची निवडणूक आयोगाने वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ठाणे पालिकेची प्रभाग रचना तसेच आरक्षण प्रक्रिया आठवडाभरापूर्वी जाहीर झाली असली तरी या रचनेच्या विरोधी सूर राजकीय वर्तुळात तीव्र होऊ लागले आहे.निवडणूक आयोगाने महापालिकेतील अधिकाऱ्यांमार्फतच प्रभाग रचनेची कार्यवाही पार पाडली. त्यामुळे रचना जाहीर होण्यापूर्वीच काही नगरसेवक जाहीरपणे त्यासंबंधीची चर्चा करू लागल्याने प्रभाग रचनेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले होते.