13 December 2017

News Flash

सिमेंटच्या जंगलातही वनसंपदा

उत्तरेकडच्या ठाणे खाडीच्या दोन्ही किनाऱ्यांवर विस्तृत पट्टय़ात खारफुटीचे जंगल आहे.

शलाका सरफरे, ठाणे | Updated: March 21, 2017 3:09 AM

येऊरपासून नाणेघाटापर्यंत विखुरलेल्या ठाणे जिल्ह्य़ात पूर्वी विपुल वनसंपदा होती. मात्र वाढत्या शहरीकरणात काँक्रीटची जंगले उभी राहिली आणि जंगलांचा जिल्हा हळूहळू ओकाबोका होऊ लागला. ठाणे जिल्ह्य़ातील बहुतेक अनधिकृत वस्त्या या वन जमिनींवर असून त्या तोडून तिथे जंगल उभारणे आता शक्य नाही; मात्र उघडेबोडके डोंगर आणि माळरानांवर नव्या रोपांची लागवड शक्य असल्यामुळे अशा प्रकारचे वनसंवर्धन हे केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर परिसरातील स्थानिक रहिवाशांसाठीही लाभदायक आहे.

ठाणे शहर उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यात वसलेले आहे. उत्तरेकडच्या ठाणे खाडीच्या दोन्ही किनाऱ्यांवर विस्तृत पट्टय़ात खारफुटीचे जंगल आहे. खाऱ्या व गोडय़ा पाण्याच्या मिश्र दलदलीच्या विशिष्ट प्रदेशात आढळणारी ही अत्यंत  महत्त्वाची अशी परिसंस्था ठाणे शहारालगत आहे. त्यामुळे या प्रदेशात विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच वाढू शकतात. त्यात मुख्यत्वे खारफुटी प्रकारात तिवरांच्या जाती, कांदळ, कर्पू प्रकारातील वृक्षांचा समावेश आहे. ठाणे खाडी परिसर रोहित पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. येथील वैभव दीर्घकाळ टिकून राहावे, यासाठी अनेक पर्यावरण संस्था कार्यान्वित असल्याची माहिती ‘फर्न’ संस्थेच्या संस्थापिका सीमा हर्डीकर यांनी दिली.  जंगलाने व्यापलेला येऊरचा डोंगर म्हणजे मुंबई आणि ठाण्यातील झपाटय़ाने वाढणाऱ्या लोकवस्तीसाठी प्राणवायूचा खजिनाच म्हणायला हवा.

वनसंपदेच्या संरक्षणाची गरज

ठाणे शहराच्या पश्चिमेला  ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या संरक्षित प्रदेशाचा भाग आहे. हे राष्ट्रीय उद्यान १०४ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात विस्तारलेले असून त्यातला जवळपास ६० टक्के भाग हा येऊर परिसरात आहे. हे जंगल मिश्र पानझडी प्रकारचे असून यामध्ये साग मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. तसेच पानझडी वृक्ष अधिक आणि सदाहरित वृक्षांच्या कमी जाती आहेत. या भागात मोह, हळदू, कळंब, महारुख, आंबाडा, काकड, ताड, साग, मोई, शिंदी कुंकु, भोकर, पळस, पांगारा, काटेसावर, हुंब, पेटारी, कुंभा, कौशी, पायर, शिवन, वड, काळा उंबर, किनई, खरोटी, चांदाडा, वावळ, रिठे, वारस, टेटू, कांडोळ, बिजा, धामण, खिरणी, आंबा, जांभूळ, काळा खुडा आदी वृक्ष ठाण्यालगतच्या जंगलांत आढळतात. त्याचबरोबर लहान, मोठे, मध्यम आकाराचे वृक्ष, झुडपे, वेली, गवत शैवाळ, नेचे, परजीवी वनस्पती अशी गुतांगुंतीची रचना येथे वनस्पतीप्रेमींना आढळली. त्याचबरोबर येऊर जंगलात जाड खोडाच्या महाकाय वेलींचे दर्शन घडते. यात उक्षी, पिळूक, गारबी, ओंबळ यांसारख्या वेलींचा समावेश आहे. या वनसंपदेमुळे या भागात अनेक प्रकारचे कीटक, फुलपाखरे, पक्षी, सरीसर्प, बेडकांच्या प्रजाती, सस्तन प्राणी आदी येथे वास्तव्यास येतात.

वनश्री पुरस्कारांचे नामकरण

ठाणे : जागतिक वनदिनानिमित्त शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वनश्री पुरस्काराचे नामकरण या वर्षीपासून करण्यात आले आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार या नावाने देण्यात येणारा पुरस्कार या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार या नावाने वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वनेतर क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना देण्यात येणाऱ्या ‘वनश्री’ आणि ‘वृक्षमित्र’ पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या व्यक्ती आणि संस्थांची नावे शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार अशा स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे विभागीय वनअधिकारी एस. डी. सस्ते यांनी सांगितले. महसूल आणि वनविभाग पुरस्कार तसेच राज्यस्तरीय पुरस्कार असे वर्गीकरण करण्यात आले आहे. व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम/ विभाग / जिल्हा यानुसार  व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. महसूल आणि वनविभागाची पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांकासाठी ५० हजार आणि द्वितीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांकासाठी एक लाख, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये आहे. यंदा कोल्हापूरमधील गणपतराव आबाजी डोंगळे, कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेला प्रथम क्रमांक, रत्नागिरीतील शिवाजीराव ऊर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयाला प्रथम क्रमांक तसेच बाबासाहेब शेळके यांना द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात येणार आहे. तसेच शिवाजी कपाळे, योगेश पाटील, सचिन पाटील, कान्हेवाडी ग्रामपंचायत, कला, विज्ञान, वाणिज्य विद्यालय, राहुरी, ट्री फॉर द फ्युचर, रत्नागिरी, संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यामंदिर, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, कोल्हापूर, शिवाजी हायस्कूल रामनगर, सरस्वती सांस्कृतिक महिला कल्याण मंडळ, जालना यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाईल.

First Published on March 21, 2017 3:09 am

Web Title: need to protect forest resources in sanjay gandhi national park