कल्याण-डोंबिवलीमध्ये वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे अखेर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. ११ मार्च, गुरुवारपासून अर्थात उद्यापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये हॉटेल, दुकानं, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्यासाठीच्या वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. लग्न समारंभांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासोबतच, होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या करोनाबाधितांना सोसायटीच्या आवाराबाहेर फिरू न देण्यासंदर्भात सोसायट्यांना देखील पालिकेकडून निर्देश देण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवलीमध्ये बुधवारी आलेली करोना रुग्णसंख्या प्रशासनासोबतच आरोग्य यंत्रणेसाठी देखील चिंतेची बाब ठरली. २४ तासांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल ३९२ नवे करोनाबाधित सापडले आहेत. ५ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ३०० हून अधिक करोनाबाधित सापडल्यामुळे सर्वच यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. यावेळी पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावून त्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यामध्ये लग्नसमारंभ, हॉटेल, दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळांबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय, अनेक सोसायट्यांमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आलेले करोनाबाधित उघडपणे फिरत असल्याचं देखील निदर्शनास आलं असून त्यासंदर्भात सोसायट्यांनी काळजी घेण्याचे देखील निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

काय आहेत निर्बध?

  1. दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी असेल. अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना यातून वगळण्यात आलं आहे.
  2. शनिवार आणि रविवारी पी-१ आणि पी-२ या व्यवस्थेनुसार दुकानं सुरू ठेवली जातील.
  3. खाद्यपदार्थ आणि पेयांच्या गाड्यांना देखील संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी असेल
  4. भाजीमंडई ५० टक्के क्षमतेनंच चालवल्या जातील.
  5. लग्न आणि हळदी समारंभांवर कडक निर्बंध असतील. अशा कार्यक्रमांमध्ये ५० लोकांच्या संख्येचं उल्लंघन करू नये. या समारंभांसाठी देखील सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंतची वेळ ठरवण्यात आली आहे.
  6. अशा कार्यक्रमांत उल्लंघन झालं, तर वधू-वराच्या माता-पित्यांविरोधात आणि मंगल कार्यालयांविरोधात गुन्हे दाखल केले जातील.
  7. आठवडी बाजारांवर देखील निर्बंध असतील.
  8. बार आणि हॉटेल्ससाठी रात्री ११ ऐवजी ९ वाजेपर्यंतचीच वेळ ठरवण्यात आली आहे.
  9. होम डिलिव्हरीसाठी रात्री १० वाजेपर्यंत मुभा असेल.
  10. पोळी-भाजी केंद्र देखील रात्री ९ पर्यंतच सुरू राहतील.
  11. महाशिवरात्रीसाठी कल्याण-डोंबिवलीमध्ये असलेले ६२ मंदिरं फक्त पूजा करण्यासाठी उघडलं जाईल, दर्शनासाठी मंदिरं बंद असतील.
  12. करोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे मास्क वापरणं अनिवार्य असेल.
  13. होम आयसोलेशनमध्ये असलेले करोना बाधित फिरताना आढळले, तर त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
  14. होम आयसोलेशनसाठी घरात जागा असणाऱ्यांनाच होम आयसोलेशनी परवानगी असेल.

कल्याणमध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १२००च्या आसपास आहेत. आपले सर्वाधित रुग्ण सध्या कोविड केअर सेंटरला आहेत. तर ३०० च्या आसपास रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.