ठाणे : ठाण्यातील घोडबंदर खाडीपलीकडे असलेल्या भिवंडी तालुक्यातील गावांमध्ये नवे ठाणे वसविण्याच्या प्रस्तावावर चर्चेनंतरच निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादीसह भाजपने सोमवारच्या सर्वसाधारण सभेत केली. मात्र सत्ताधारी शिवसेनेने ती मागणी फेटाळून लावत अभूतपूर्व गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

घोडबंदरच्या खाडीपल्याड आणि उल्हास नदीच्या किनारी भिवंडी तालुक्यातील गावांचा विशेष नगर नियोजनातून विकास करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यामध्ये खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या गावांचा समावेश आहे.  सोमवारी सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर केला किंवा नामंजूर केला तरी या भागाचा विकास होणारच आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून या योजनेत सहभागी झाल्यास ठाण्याचे नाव होईल, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात सांगितले. ठाणे शहरामध्ये ८० जागांचा विकास झाला असून आता विकासासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. शासनाची घरे उभारणीची योजनाही भविष्यात राबवावी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून  प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे शहर विकास विभागाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी सभागृहात सांगितले. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी प्रस्तावासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. या भागाचा विकास आराखडा तयार करताना एमएमआरडीएने काही परिसर का वगळला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच सर्व शंका दूर झाल्यानंतर प्रस्तावावर निर्णय घेण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरला. विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील आणि भाजपचे गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटणकर यांनी प्रस्तावावर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याची मागणी केली. सभेची वेळ संपत आल्यामुळे हा प्रस्ताव तहकूब करण्याची मागणी केली. त्यावरून सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळात शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला.