01 December 2020

News Flash

फटाके विक्रीला तूर्तास मोकळीक

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

पालिका, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय नाही; मात्र पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

ठाणे : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला तरी ठाणे जिल्ह्य़ात मात्र अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय जिल्हा तसेच पालिका प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्य़ात तूर्तास तरी फटाके विक्रीस बंदी नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी यंदा करोनाच्या काळात प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

करोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास होण्याचा दावा समाज माध्यमांवर केला जात असून ठाण्यातील काही राजकीय पक्षांनी यंदाच्या दिवाळीत फटाकेविक्री आणि वाजविण्यास बंदी घालण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही. तसेच राज्य शासनाने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीसंदर्भात नवी नियमावली तयार केली असून त्यात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.

तसेच केवळ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यास परवागनी देण्यात आली आहे. अशाच प्रकारचा

निर्णय ठाणे जिल्ह्य़ातही होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु जिल्हा आणि पालिका प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन नागरिकांना यापूर्वीच करण्यात आले आहे. तसेच शासनाकडून याबाबत काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागातही अद्याप फटाकेबंदीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्य़ात तूर्तास तरी फटाकेविक्री सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाकडून अद्याप निर्णय नाही

यंदाच्या दिवाळीत वाजविल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास करोनाबाधित रुग्णांना होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. यासंबंधीचे काही संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून त्यात करोना रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांच्या बंदीचे आवाहन केले जात आहे. तसेच ठाण्यात दिवाळीमध्ये फटाके विक्री आणि वाजविण्यास बंदी आणावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. करोना रुग्णांना फटाका प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी ही मागणी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु राज्य शासनाने फटाके बंदीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे जिल्ह्य़ातही याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 2:44 am

Web Title: no ban on firecrackers in thane district zws 70
Next Stories
1 ठाण्यात शेअर रिक्षांमध्ये तीनहून अधिक प्रवासी
2 फटाका व्यवसायाला करोनाचा फटका
3 पार्किंगची सीमारेषा
Just Now!
X