30 September 2020

News Flash

धोकादायक इमारतींची गणनाच नाही

पालिकेकडे असलेल्या प्राथमिक यादीनुसार सर्वाधिक इमारती नालासोपारा विभागात आहे.

पावसाळा तोंडावर आला असतानाही यादी जाहीर नाही; वसई-विरार महापालिकेचा संथ कारभार

नालेसफाईचीे कामे उशिरा सुरू करणाऱ्या वसई-विरार महापालिकेने अद्याप धोकादायक इमारतींची संपूर्ण यादी जाहीर केलेली नाही. गुरुवारी पहिल्या बैठकीत सर्व कार्यकारी अभियंत्यांना धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेकडे सध्या २५० धोकादायक इमारतींची यादी आहे. ही यादी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वर्गवारी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या या संथ कारभारावर विरोधकांनी टीका केली आहे.

प्रत्येक महापालिकांतर्फे पावसाळ्याच्या आधी शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार वर्गवारीप्रमाणे इमारतींची डागडुजी, दुरुस्ती तसेच अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. परंतु मे महिना संपत आला तरी वसई-विरार पालिकेकडे धोकादायक इमारतींची संपूर्ण यादी अद्याप उपलब्ध नाही.

प्राथमिक माहितीनुसार शहरात २५० इमारती धोकादायक आहेत. सर्वेक्षणाचे काम सुरू असून येत्या दोन दिवसांत संपूर्ण यादी हाती येईल, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता बी. एम. माचेवाड यांनी दिली.

इमारतींची वर्गवारी

पालिकेकडे असलेल्या प्राथमिक यादीनुसार सर्वाधिक इमारती नालासोपारा विभागात आहे. या सर्व इमारतींना नोटिसा पाठविल्या असल्याचे आयुक्त लोखंडे यांनी सांगितले. धोकादायक इमारतींची यादी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वर्गीकरण केले जाणार आहे. सी१ ते सी५ अशी त्यांची वर्गवारी केली जाईल. सी१ वर्गात अतिधोकादायक इमारतींचा समावेश होतो. संबंधित पोलीस ठाण्याला त्याची माहिती देऊन या इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढले जाते. अन्यत्र त्यांचे पुनर्वसन केले जाते. इतर वर्गातल्या इमारतींची दुरुस्ती सुचवली जाते. मे महिना संपत आल्याने अद्याप धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपाययोजना झालेली नाही. मार्च महिन्याच्या अखेपर्यंत धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून पुढील उपाययोजना केल्या जातात. आता मे महिना संपल्याने ऐन पावसाळ्यात पालिका काय काम करणार, असा सवाल उपस्थित झालेला आहे.

विरोधी पक्षांची टीका

धोकादायक इमारतींचा प्रश्न सर्वात शेवटी हातीे घेतल्याने विरोधकांनीही टीका केली. धोकादायक इमारतीे पावसाळ्यात कोसळून दुर्घटना घडल्याचा इतिहास आहे. मग पालिका कसलीे वाट बघत होती, असा सवाल सर्वच विरोधी पक्षांनी केला आहे. पावसाळ्याला कमीे दिवस राहिल्याने पालिकेचीे मोठी कसोटी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:32 am

Web Title: no calculation of dangerous building in vasai
Next Stories
1 शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
2 गटाराची झाकणे निकृष्ट दर्जाची
3 मत्स्याचा दुष्काळ, त्यात कर्जाचा डोंगर
Just Now!
X