आपल्या प्रभागात आपणच विकासाची कामे केली हे जनतेला दाखवण्यासाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू झाला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर असे वातावरण निर्माण करणे प्रत्येक नगरसेवकाला गरजेचे वाटत आहे. पण, एखाद्या कार्यकर्त्यांने स्वीकृत नगरसेवकाच्या निधीतून प्रभागात विकासकाम करण्याचा प्रयत्न केला तर ते विकासकाम झाले नाही तरी चालेल पण स्वीकृत नगरसेवकाचा निधी आपल्या प्रभागात नको, अशी आक्रमक भूमिका काही नगरसेवकांनी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे होणाऱ्या विकासकामांना खीळ बसण्यास सुरुवात झाली आहे.

– डोंबिवलीतील गोग्रासवाडीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी सेनेचे स्वीकृत नगरसेवक केतन दुर्वे यांच्याकडे गोग्रासवाडी प्रभागात रस्त्याचे काम करण्यासाठी निधीची मागणी केली होती. निधी शिल्लक असल्याने नगरसेवक दुर्वे यांनी गेल्या वर्षी गोग्रासवाडी कमान ते पुढील रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर गेल्या महिन्यात या रस्ते कामाला अंतिम मंजुरी मिळाली. त्या रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
– आपल्या प्रभागात नगरसेवक दुर्वे यांच्या निधीतून काम केले जात आहे, हे सहन न झाल्याने गोग्रासवाडी प्रभागाच्या मनसेच्या नगरसेविका वैशाली राणे यांनी दुर्वे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आपण या रस्तेकामासाठी या वेळच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. असे असताना आपण हे काम कसे करता असा प्रश्न नगरसेविका राणे यांनी दुर्वे यांना केला. ठेकेदाराने गोग्रासवाडी कमानीजवळ कामाला सुरुवात करताच राणे यांनी पालिका मुख्यालयात जाऊन या कामाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. सुरू झालेले काम थांबवायचे कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला होता.
– गांधीनगर प्रभागातील दिवंगत आनंद दिघे सभागृह पावसाळ्यात गळते. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी नगरसेवक दुर्वे यांच्याकडे विकास निधीची मागणी केली होती. या निधीतून दिघे सभागृहावर पत्रे टाकण्याचे काम करण्यात येणार होते. दुर्वे यांच्या निधीतून हे काम करण्यात येत असल्याचे कळताच स्थानिक नगरसेवक सुदेश चुडनाईक यांनी दुर्वे यांना आपण हे काम करणार आहोत. त्यामुळे आपण पत्रे टाकण्याचे काम आपल्या निधीतून करणार असाल तर ते थांबवा असे सांगितले. गेली पाच वर्षे मतदार नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देणारे, नागरिकांच्या समस्या ऐकून न घेणारे सर्वपक्षीय नगरसेवकांना पालिका निवडणुका तोंडावर दिसू लागताच आता प्रभागातील कोणती कामे करू नि कोणती नको असे झाले आहे. कामाच्या ठिकाणी भला मोठा फलक लावून करून दाखवलेलेच फलक अनेक ठिकाणी दिसत आहेत.

टोलबंदीचे श्रेय?
काटई येथील टोल नाका बंद करण्यात आला आहे. तरीही, स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे हा टोल बंद करण्यातआल्याचा फलक लावून टोल बंदचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.