एखादा पूल अथवा प्रकल्प शहरात उभारला तर त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण येतात. मात्र वसईतील राजावली खाडीत बांधलेला एक अनधिकृत पूल कुणी बांधला हे सांगण्यास कुणीही तयार नाही. वसईतील पूरस्थितीला कारणीभूत ठरलेला हा पूल पाडण्यात आला असला तरी या पुलाबाबत सारेच मौन बाळगून आहे. दोन वर्षांपासून या पुलाविरोधात तक्रारी होत्या, पण कुणीच कारवाई केली नव्हती.

९ जुलैच्या पावसानंतर वसईत महाकाय पूर आला आणि वसई ठप्प झाली. वसईतून पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले होते. पालिका प्रशासन हतबल झाली. मग राजावली खाडीत भराव टाकून एक पूल बांधला असल्याचे लक्षात आले आणि तो पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेचे पथक राजावली खाडीत पोहोचले. तो पूल जमीनदोस्त केला आणि खाडीत केलेला भराव मोकळा केला. वसईतलं पाणी ओसरलं. वसईत जो पूर आला, त्याला अनेक कारणं होती. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे राजावली खाडीत भराव टाकून उभा केलेला पूल होता. कुणी बांधला होता हा पूल, कशासाठी बांधला होता, याची उत्तरे कुणाकडे नाहीत. सर्व शासकीय यंत्रणा गप्प होत्या. हा पूल कोणाचा ते आम्हाला माहीत नाही, असे सर्व शासकीय यंत्रणा सांगत आहेत. या पुलाचे रहस्य आजही कायम आहे.

शहरात जमा होणारे पाणी नैसर्गिक नाल्यांद्वारे खाडीला मिळते आणि तेथून ते समुद्राला जाते. गेल्या काही वर्षांपासून हे नैसर्गिक नाले ठिकठिकाणी बुजवण्यात येत आहे. नालासोपारा पूर्वेचे पाणी रेल्वेच्या कल्वाटमधून नालासोपारा पूर्वेला तेथून वसईत येते. हे पाणी सोपारा खाडीतून मग राजावली खाडीत जाते आणि तेथून समुद्राला मिळते. वसईतील सातिवली, गोखिवरे, एव्हरशाइन, चुळणा, कौल सिटी येथून पाणी सोपारा खाडीत आणि राजावली खाडीतून जाते. एवढी ही महत्त्वाची खाडी आहे. अशा या महत्त्वपूर्ण खाडीत एक बेकायदा पूल बांधला जातो आणि तब्बल दोन वर्षे कुणाला पत्ता नसतो. हा बेकायदा पूल कुणी बांधला त्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी आता होई लागली आहे.

वसई आणि नायगाव परिसरात खाडी किनारी स्थानिक मीठ उत्पादन करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. राजावली येथील खाडीत २०१६ मध्ये हा पूल उभारण्यात आला. त्या वेळी एका जागृत मीठ उत्पादकाने तक्रारी करण्यास सुरुवात केली. कारण खाडीत भराव केल्याने भरतीचे पाणी उलटे येईनासे झाले आणि मीठ उत्पादनावर परिणाम होऊ  लागला होता. या खाडीतून पाणी समुद्रात जाते. भराव झाल्याने आणि पूल बांधल्याने पाणी अडत आहे. शहरात मोठा पाऊस झाला तर पूर येईल, अशी भीती त्यांनी वर्तवली होती. पुढील वर्षी ही भीती काही प्रमाणात खरी ठरली. मात्र काहीच कारवाई झाली नाही आणि जुलै २०१८ मध्ये वसईत पूरसंकट आले. ९ जुलैपासून शहरात पाऊस पडायला सुरुवात झाली. दिवसाला सरासरी २१० मिलिमीटर पाऊस पडला आणि शहरात पूर आला. या खाडीतून पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला होता.

या अनधिकृत पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका, मीठ विभाग या सर्वाकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र सर्वानी केवळ पूल आमचा नाही, कुणाचा आहे ते माहीत नाही एवढेच सांगितले. अधिकृतरीत्या पूल कोणाचा हे कुणीच सांगायला तयार नाही. त्यामुळे पुलाचे गूढ वाढले आहे.

शिवसेनेने आरोप केला आहे की राजावली परिसरात एका बडय़ा उद्योगसमूहाचा प्रकल्प येतोय. त्या उद्योगसमूहाची ही जागा मोठय़ा कंपनीने विकत घेतली आणि त्यांनी हा पूल बांधला आहे. शहरात अनधिकृत इमारती उभ्या राहतात. परंतु अनधिकृत पूल असणारे हे पहिलेच शहर असावे. पूल बांधणे हे रेल्वे, सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीएचे काम. तरी एक पूल उभा राहिला आणि कुणालाच तो गंभीर वाटला नाही. स्थानिक मीठ उत्पादकाने तक्रारी केल्या होत्या. त्याकडे का दुर्लक्ष करण्यात आले.

नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम खाते आणि एमएमआरडीएच्या साहाय्याने तयार होत आहे. तो पूल या खाडीवरून जात आहे. तक्रार आल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने पाहणी केली. पण आमचा संबंध नाही, एवढेच सांगितले. तो पूल तुटला आहे. पण वसईकरांवर आलेली संकटाची हानी न भरून येण्याजोगी आहे. ज्यांनी पूल बांधला आणि ज्यांनी या पुलाला संरक्षण दिले त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.