नालासोपाऱ्यात पाच जणांना नोटिसा, तीन पथकांवर कारवाई

गणेशोत्सव साजरा करताना आवाज आणि वेळेची मर्यादा पाळण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, नालासोपाऱ्यात या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. नियमभंग करणाऱ्या ‘आवाजी’ मंडळांवर तुळींज पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विनापरवानगी वाद्य वाजविणाऱ्या तीन पथकांवरही पोलिसांनी कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेक मंडळाने या नियमांचे उल्लंघन करून वेळेची मर्यादा ओलांडली होती. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलिसांनी या मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधीच तुळींज पोलिसांनी हद्दीत नोंद झालेल्या २०५ सार्वजनिक गणेश मंडळांना नोटिसा बजावल्या होत्या. त्याना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे बजावले होते. मात्र तरीही पाच मंडळांनी या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल विभागीय पोलीस उपअधीक्षकांना देण्यात आला असून त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले. त्यासाठी तुळींज पोलिसांनी खास पथकही तयार केले होते. हे पथक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर लक्ष ठेवून होते. ज्या मंडळांनी परवानगी न घेता बॅण्ड आणि डीजे लावला अशा तिघांवर ‘मुंबई पोलीस अ‍ॅक्ट’नुसार कारवाई करून वसई न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दहाव्या दिवशीसुद्धा मोठय़ा प्रमाणावर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दहीहंडीच्या काळातही तुळींज पोलिसांनी जास्त उंचीचे थर लावणाऱ्या पाच मंडळांवर गुन्हे दाखल केले होते.

वसई-विरार शहरात सात पोलीस ठाणी आहेत. सर्व पोलीस ठाण्यांनी बजावलेल्या नोटिसा एकत्रित करून मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील. विनापरवाना डीजे किंवा वाद्य वाजवणाऱ्या मंडळांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

– अनिल आकडे, विभागीय पोलीस उपअधीक्षक