ठाणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे दीड, पाच आणि सात दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे मिरवणूकविनाच विसर्जन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात ध्वनिप्रदूषण २५ ते ३० डेसिबलने कमी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे करोनाच्या निमित्ताने का होईना विसर्जन मिरवणुकांच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण टळल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सवात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महापालिकेने नियमावली तयार केली होती. यामध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला बंदी घातली आहे. गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी तीन जण असावेत, अशाही सूचना होत्या. त्याचे पालन करत ठाणेकरांनी ढोल, ताशे, बॅँजो, डीजेचा वापर टाळून साधेपणाने दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणात घट झाल्याची बाब समोर आली आहे.

ठाण्यातील दक्ष नागरिक महेश बेडेकर यांनी २३ आणि २७ ऑगस्ट रोजी विविध भागांत आवाजाची पातळी मोजली. यामध्ये सरासरी ६० ते ७० टक्के डेसिबलची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी सरासरी ९० ते ९५ डेसिबल नोंद झाली होती. त्यामुळे यंदा ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे स्पष्ट झाले. ठाण्यातील राम मारुती रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे वाद्य आणि डीजे वाजत नव्हते. तलावपाळी परिसरात वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. त्याचबरोबर येथे वाद्य आणि डीजेचा वापर दिसून येत नव्हता. याठिकाणी पोलीस गर्दीला नियोजनबद्ध पद्धतीने हाताळताना दिसत होते. तीन हात नाका येथे केवळ वाहनांचा आवाज होता. गोखले रस्त्यावर वाद्याविनाच छोटय़ा मिरवणुका जात होत्या. तर कोपरी बारा बंगला येथेही छोटय़ा मिरवणुका होत्या. त्यामध्ये काही जणांनी फटाके वाजविल्यामुळे आवाजाच्या पातळीत थोडीशी वाढ झाली आहे, असे निरीक्षण डॉ. बेडेकर यांनी नोंदविले आहे.

आवाजाची पातळी (आकडेवारी डेसिबलमध्ये)

ठिकाण                        गेल्यावर्षी                       आता

राम मारुती रोड                   ८५-९०                    ६०-६५

तलावपाळी                          ७५-८०                   ६५-७०

तीन पेट्रोल पंप                    ८०-८५                    ६५-७०

पाचपखाडी                          ८०                           ७०

गोखले रोड                           ८५                          ६५

कोपरी बारा बंगला               ८०-९०                     ८५-९०

कोपरी स्थानक परिसर         ८५-९०                   ७०-७५

बेथनी हॉस्पिटल                      –                       ६०-७०

तीन हात नाका                        –                       ६५-७०

उपवन तलाव                            –                       ७५