15 August 2020

News Flash

‘विषाणू वाहक’ ठरलो नाही हेच समाधान!

माजी खासदार आनंद परांजपे यांची भावना

संग्रहित छायाचित्र

जयेश सामंत

माझे सहकारी एकामागोमाग एक रुग्णालयात दाखल होत असल्याच्या बातम्या कानावर येत असताना कोणताही त्रास नसला तरी स्वत:ला कणखर ठेवण्याचे आव्हान होते. तसेच मी वेळीच रुग्णालयात दाखल झाल्याने ‘करोना विषाणू’चा वाहक ठरलो नाही याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

करोनाबाधित ठरल्याने गेले १५ दिवस रुग्णालयात दाखल होतो. या काळात कसलाही त्रास जाणवला नाही. तरीही दोन वेळा केलेला चाचणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे डॉक्टरही चक्रावून गेले होते. सोमवारी केलेल्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि डॉक्टरांनी ‘तुम्ही आता घरी जाऊ शकता’, असे सांगितल्याचे परांजपे म्हणाले.

टाळेबंदीत शहरातील मजूर आणि असंघटित कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा परिसरात खिचडीवाटपाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. दररोज ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना दोन वेळचे जेवळ मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आम्ही व्यग्र होतो. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकही आमच्या सोबत असायचे. मात्र त्यांना करोनाची लागण झाल्याचे समजताच आम्ही सर्वानी चाचण्या करून घेण्याचे ठरविले. पहिल्याच चाचणीत मी पॉझिटिव्ह आढळलो. माझ्यासह माझे काही सहकारीही ‘पॉझिटिव्ह’ असल्याचा अहवाल आला.

अहवाल आल्यामुळे थोडे अस्वस्थ व्हायला झाले. त्यामुळे तातडीने पत्नीची चाचणी करून घेतली. त्यात तीही ‘पॉझिटिव्ह’ आढळली. त्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली. मात्र आम्हा दोघांनाही कसलाही त्रास होत नव्हता. महापालिकेच्या सल्ल्यानुसार घोडबंदर भागातील होरायझोन रुग्णालयात दाखल झालो. तेथे पहिले सहा दिवस डॉक्टरांनी प्रतिजैविके दिली. मला आणि माझ्या पत्नीला कोणताही त्रास होत नाही हे पाहून सहा दिवसांनी औषधे बंद करण्यात आली. त्यानंतर सकस आहार, पथ्य सुरू झाले. प्रत्येक तीन तासांनी माझी तपासणी होत असे. त्यात शरीराचे तापमान, रक्तदाब असे सगळे योग्य असल्याचे डॉक्टर सांगायचे. त्यामुळे मी घरी जाऊ शकतो का अशी विचारणा डॉक्टरांकडे केली. त्यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा करोनाची चाचणी करण्यात आली.

दुसऱ्या चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह असाच आला. हे पाहून मला आणि पत्नीला धक्काच बसला. कोणताही त्रास जाणवत नसताना दोन वेळा असा अहवाल आलेला पाहून डॉक्टरही भांबावले असल्याचे जाणवले. मात्र, त्यांना सहकार्य करायचे हे पक्के ठरले होते. याच काळात काही सहकारी, नेते रुग्णालयात दाखल होत होते. त्यामुळे दडपण होतेच. पण त्रास कसलाच होत नव्हता. अखेर सोमवारी केलेल्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि डॉक्टरांनी घरी जाण्यास अनुमती दिली.

वेळीच चाचणी झाली नसती तर..

केवळ मुंब्रा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना लागण झाली. त्यामुळे आम्ही चाचणी करून घेतली. अन्यथा, आजवर आणि मागील १४ दिवसांत कोणताही त्रास नसल्यामुळे चाचणी करण्याचा प्रश्नच नव्हता. अहवाल मात्र, ‘पॉझिटिव्ह’ येत होता. वेळीच चाचणी केली नसती तर कदाचित मी करोनाचा सर्वात धोकादायक वाहक ठरलो असतो, या विचाराने सुन्न व्हायला होते. या आजाराची ही बाजू अंगावर काटा आणणारी आहे, असेही परांजपे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2020 1:12 am

Web Title: not a virus carriers thats gratification says anand paranjape abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 फिरत्या चाकावरती मातीला आकार देणाऱ्यांचेही अर्थचक्र थांबले!
2 Coronavirus: कल्याण-डोंबिवलीत १३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद
3 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांची करोनावर मात
Just Now!
X