मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांचा आदेश; पालिका कर्मचाऱ्यांसह नळजोडणी घेणाऱ्यावरही गुन्हा

वसई-विरार शहरात बेकायदा नळजोडणी घेणे आणि देणे आता फौजदारी गुन्ह्य़ामध्ये मोडणार आहे. शहरात कुणी बेकायदा नळजोडणी घेतली, तर घेणाऱ्या व्यक्तीवर आणि ही नळजोडणी देणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. यापूर्वी घेतलेल्या नळजोडण्या आठ दिवसांत खंडित करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

वसई-विरार शहरात पाण्याची कमतरता असल्याने नवीन नळजोडण्या बंद करण्यात आल्या आहेत, परंतु लोकवस्त्या झपाटय़ाने वाढत असून त्यांना पाण्याची गरज भासते. ही गरज लक्षात घेऊन शहरात पाणीमाफिया तयार झाले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे पाणीमाफिया नागरिकांना बेकायदा नळजोडण्या देऊन लाखो रुपये उकळतात. या बेकायदा नळजोडण्यांमुळे शहराच्या पाणीवितरण व्यवस्थेवर परिणाम व्हायचा. याबाबत बोलताना पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले की, वॉलमन हे प्रामुख्याने बेकायदा नळजोडण्यांमध्ये सक्रिय असतात. आम्ही सर्वाना समान पाणीवाटपासाठी प्रयत्न करत असताना वॉलमन दलालांना हाताशी धरून बेकायदा नळजोडण्या देत असतात. त्यामुळे पाण्याचीे चोरी होऊन अधिकृत नळजोडणीधारकांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे अशी चोरी

करणाऱ्यांवर यापुढे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. पालिकेच्या ज्या वॉलमन किंवा कर्मचाऱ्याने नळजोडणी दिली असेल त्याच्यावर हे गुन्हे दाखल होतीलच, शिवाय ज्यांनी या नळजोडण्या घेतल्या त्यांच्यावरही हे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

सूर्या धरण प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ३ चे शंभर दशलक्ष लिटर्स पाणी हे पुढील ३ ते ४ महिन्यांत येणार आहे. त्यानंतरच नवीन अधिकृत नळजोडण्या दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.