भिवंडी येथील धामणकर भागातून दहा दिवसांपूर्वी कुमार हरजन या एकवर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या तावडीतून कुमारची सुखरूप सुटका केली असून रंगारी कामाच्या व्यवसायात तीन ते चार लाखांचे कर्ज झाल्यामुळे ते फेडण्यासाठी आरोपीने हे अपहरण केल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे.

रोहित कोटेकर (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. धामणकर नाका येथील पद्मानगर भागातील एका उड्डाणपुलाखाली कुमार हा आई-वडिलांसोबत राहतो. ३ जून रोजी पहाटे चार वाजता तो पुलाखाली झोपला असताना रोहित याने त्याचे अपहरण केले. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. या तपासादरम्यान रोहित याने
कुमारचे अपहरण केले असून रोहित हा भिवंडीत राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे पथकाने सापळा रचून रोहितला अटक केली.
चौकशीदरम्यान त्याने साथीदाराच्या मदतीने कुमारचे अपहरण केल्याची कबुली दिली. या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.

पैशासाठी अपहरण
उत्तर प्रदेश येथील एका महिलेला मूल होत नव्हते. तिने भिवंडीतील नातेवाईकाशी संपर्क साधून त्यांना मूल मिळू शकेल का, अशी विचारणा केली होती. या नातेवाईकाच्या शेजारीच रोहित राहतो. या नातेवाईकांनी रोहितकडे याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्याने पैसे दिल्यास मूल आणून देतो, असे सांगितले होते. त्यास ती महिला तयार झाल्यानंतर त्याने कुमारचे अपहरण केले आणि कुमारला तिच्या ताब्यात दिले. मात्र, या अपहरणाबाबत त्या महिलेला काहीच माहिती नव्हते, अशी बाब तपासात पुढे आली आहे.