News Flash

चर्चेतील चर्च : निसर्गरम्य बंदरावरील तीर्थक्षेत्र

उत्तन नाक्यावरून भाटेबंदर गावातून पुढे गेले की समुद्राला खेटूनच चर्चची अतिशय आकर्षक अशी वास्तू नजरेस पडते.

उत्तन येथील भाटेबंदर परिसरात समुद्राच्या काठावर आणि डोंगराच्या कुशीत वसलेले वेलंकनी चर्च म्हणजे निसर्गरम्य परिसरातील तीर्थक्षेत्रच! या चर्चची इमारत अतिशय आकर्षक असून भक्तांची नेहमीच येथे गर्दी असते.

वेलंकनी चर्च, उत्तन

निसर्गरम्य उत्तन येथील भाटेबंदर परिसरातल्या डोंगराच्या कुशीत वसलेले वेलंकनी चर्च हे भक्तांसाठी कायमच प्रेरणादायी ठरलेले तीर्थस्थळ आहे. काही वर्षांपूर्वीच मुंबईच्या बिशप हाऊसने या चर्चला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. वांद्रे येथील माउंट मेरी या चर्चनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात वेलंकनी चर्च हे दुसरे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र घोषित झाल्यानंतर भक्तांचा ओढा या चर्चकडे अधिकच वाढू लागला आहे.

उत्तन नाक्यावरून भाटेबंदर गावातून पुढे गेले की समुद्राला खेटूनच चर्चची अतिशय आकर्षक अशी वास्तू नजरेस पडते. या चर्चची स्थापना सुमारे तीस वर्षांपूर्वी करण्यात आली. चर्च स्थापनेमागेदेखील एक प्रेरणा असल्याचे स्थानिक सांगतात. मॉन्सियर फ्रान्सिस कोरिया सहज फिरत फिरत भाटेबंदर परिसरात आले. याठिकाणी मुलांना शिकवणारे मिशनरी ब्रदर हरमन यांचा दीडशे वर्षांपूर्वीचा पुरातन क्रॉस आहे. या क्रॉसजवळ उभे असताना कोरिया यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी याठिकाणी वेलंकनी चर्चची स्थापना केली, असे सांगितले जाते. २००० मध्ये चर्चचे नूतनीकरण झाल्यानंतर चर्चची देखणी वास्तू उभी राहिली आहे. चर्चच्या आवारात असलेली हिरवळ, कारंजे, विद्युतमय बगिचा त्यातच एकीकडे गर्द हिरवाईने नटलेला डोंगर आणि दुसरीकडे अथांग पसरलेला समुद्र अशा नयनरम्य वातावरणात हे चर्च उभे असल्याने चर्चच्या आवारात प्रवेश करताच मन एकदम प्रसन्न होऊन जाते.

चर्चमधल्या वेदीवरील शिल्पाकृती भक्तांच्या आकर्षणाचे मुख्य स्थान आहे. मुख्य वास्तूसह मरिया वंदनगृह, आराधनागृह, ब्रदर हरमन यांचा पुतळा, तसेच धार्मिक संग्रहालयाचा समावेश यात आहे. गेल्याच वर्षी चर्चच्या आवारात उंच डोंगरावर मदर मेरीचा भव्य वीस फुटी उंच फायबरपासून बनवलेल्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. जपमाळ मातेची मूर्ती या नावाने ती ओळखली जाते. याचवर्षी मुंबई सरधर्मप्रांताचे बिशप पर्सीवल फर्नाडिस यांच्या हस्ते येथील जपमाळ मनोऱ्याचे उद्घाटन झाले. डाव्या हातात बाळ येशू आणि उजव्या हातात जपमाळ असलेली देवीची मूर्ती भक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

चर्चचे तीर्थाचार्य म्हणून हिलरी फर्नाडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त चर्चच्या दररोजच्या कामकाजावर तसेच विविध उपक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून स्थानिक रहिवासी रेनॉल्ड बेचरी समितीचे अध्यक्ष आहेत. चर्चमध्य भक्तांना भक्ती करण्यासाठी विविध वास्तू आहेतच, शिवाय आणखी एक आगळीवेगळी वास्तू नजीकच्या भविष्यात याठिकाणी आकाराला येणार आहे. मासे हे उत्तन परिसरातल्या रहिवाशांचे उपजीविकेचे मुख्य साधन तसेच माशाला ख्रिस्ती धर्मातही महत्त्वाचे स्थान आहे. अनेक महत्त्वाच्या चिन्हांमध्ये मासा या चिन्हाचा समावेश होतो. यासाठी चर्चच्या आवारातच माशाच्या आकाराचे लुर्ड्स माता वंदनगृह लवकरच आकाराला येणार आहे. अगदी समुद्राला लागून ही वास्तू असणार आहे. माशाच्या शेपटीकडील बाजूस देवीची मूर्ती ठेवण्यात येणार असून समुद्राच्या साक्षीने भक्तांना याठिकाणी प्रार्थना करता यावी यासाठी समुद्राकडच्या भागाकडे पारदर्शक काचेची भिंत उभारण्यात येणार आहे. या वास्तूच्या रूपाने भक्तांना प्रार्थनेसाठी आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे महत्त्वाचे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

वेलंकनी चर्चची ओळख ‘आरोग्य माता’ अशी असल्याने या चर्चमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आजारी, पीडित, गरजू येत असतात. त्यांच्यासाठी दिवसभर प्रार्थनेचे आयोजन केले जाते, तसेच सर्वाच्या भोजनाची व्यवस्थादेखील चर्चकडून केली जाते. आतापर्यंत चर्चमध्ये रविवारी केवळ इंग्रजीमधूनच मिस्सा आयोजित केला जात असे. भक्तांच्या सोयीसाठी आता नवीन वर्षांच्या प्रारंभापासून दर रविवारी सकाळी साडेआठ वाजता मराठीतही मिस्सा सांगितला जाणार असून चर्चतर्फे याद्वारे नवीन पायंडा पाडला जात आहे.

या चर्चचा लौकीक ऐकून पोप यांचे भारतीय राजदूत आर्चबिशप पेद्रो लोपीस क्विंताना यांनीही २००४ साली चर्चला भेट दिली. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस वेलंकनी मातेचा सण साजरा केला जातो. नऊ दिवस साजरा होणाऱ्या या सणाला सर्वधर्मीय लाखो भाविक उपस्थित राहात असतात. धार्मिक तसेच सामाजिक विषयावरील विविध धर्मगुरूंचे प्रवचन, मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ तसेच कोकणी भाषेतील मिस्सा, बँडच्या तालावर भक्तिगीते असा हा एकंदर सोहळा असतो. या दिवसात संपूर्ण उत्तनचा परिसर भक्तिरसात न्हाऊन जात असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:02 am

Web Title: our lady of vailankanni shrine bhatebunder uttan
Next Stories
1 शहरबात, वसई : तात्पुरता दिलासा!
2 अनैतिक प्रेमसंबंधातून महिलेची हत्या
3 तरुणाच्या हत्येप्रकरणातील आरोपी त्रिकुटाला अटक
Just Now!
X