ठाण्यात पारपत्र घेणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात
ऑनलाइन अर्जप्रक्रिया, सुव्यवस्थित नियोजन, रांगविरहित पडताळणी प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा अवलंब या सर्वामुळे ठाण्यातील पारपत्र कार्यालयाचा कारभार वेगवान झाला आहे. मात्र, त्याबरोबरच पारपत्र (पासपोर्ट) घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. केवळ ठाणे पोलिसांकडे पडताळणीसाठी येणाऱ्या कागदपत्रांचीच आकडेवारी गृहीत धरली तर गेल्या ११ महिन्यांत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली या शहरांतून पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ९० हजारांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी हीच संख्या ४८ हजार इतकी होती. विशेष म्हणजे, पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांत मुंब्रा परिसरातील नागरिकांची संख्या सर्वाधिक असून त्यातही हज यात्रेसाठी जाणाऱ्यांचा आकडा बराच मोठा आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येतात. या शहरांमधील नागरिकांनी पारपत्र कार्यालयात अर्ज दाखल केला तर त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी पारपत्र कार्यालयाकडून ठाणे पोलीस आयुक्तालयात पाठविण्यात येतात. ठाणे पोलिसांनी पारपत्र पडताळणीसाठी स्वतंत्र विभाग तयार केला असून या विभागाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइनद्वारे केले आहे. यापूर्वी या विभागाचे कामकाज मानवी पद्घतीने हाताळले जात असल्याने पासपोर्ट मिळण्यास विलंब व्हायचा. एकीकडे कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया वेगाने होत असताना दुसरीकडे पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा आकडा दुपटीने वाढला आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ शी बोलताना दिली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पारपत्र पडताळणी अर्जदारांचा आकडा ९१ हजारांपर्यंत पोहोचला असून वर्षअखेरीस तो एक लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंब्रा विभागातून सर्वाधिक सुमारे आठ हजार अर्ज आले आहेत. हज यात्रेला जाण्याकरिता पारपत्र मिळविण्यासाठी मुंब्रा भागातून अर्ज करणारांची संख्या मोठी असते. याशिवाय, शिक्षण तसेच नोकरीनिमित्तानेही पारपत्रासाठी अर्ज करण्यात येतात. त्या तुलनेत भिवंडी आणि राबोडी या मुस्लीमबहुल वस्तीतून मात्र पारपत्रासाठी फारसे अर्ज आलेले नाहीत, हे विशेष. मुंब्रापाठोपाठ वर्तकनगर भागातून सहा हजार, कापुरबावडी भागातून ४६५६, कासारवडवली भागातून ४२१६ आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५३१८ अर्ज पारपत्र पडताळणीसाठी आले आहेत. तसेच उर्वरित पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जेमतेम एक ते दोन हजारांच्या घरात अर्ज पडताळणीसाठी आले आहेत. नौपाडा, पाचपाखाडी, खोपट परिसरातून मात्र जेमतेम एक हजाराच्या घरात असे अर्ज प्राप्त झाले आहेत.

अर्ज निकाली निघण्याचे प्रमाण वाढले..
ठाणे पोलीस आयुक्तालयातील पारपत्र विभागाचे कामकाज २०१२ पासून ऑनलाइन यंत्रणेशी जोडण्यात आले आहे. २०१३ पासून ऑनलाइन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाली आणि त्या आधारेच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेनुसार पोलिसांच्या पारपत्र विभागाने २०१३ मध्ये ३६ हजार २६० तर २०१४ मध्ये ४८ हजार ७१० अर्ज निकाली काढले. यंदाच्या वर्षांत मात्र हा आकडा दुपटीने वाढला असून तो ९१ हजार १५७ अर्ज निकाली काढले आहेत. हा आकडा नोव्हेंबपर्यंतचा असला तरी तो डिसेंबरअखेर एक लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या पारपत्र विभागाच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक सीमा अडनाईक यांनी दिली.