केळवे आणि माहीममधील दूरध्वनी सेवा चार महिन्यांपासून बंद

पालघर तालुक्यातील केळवे आणि माहीम गावातील दूरध्वनी सेवा गेले चार महिने बंद आहे.  या गावातील ग्राहकांना दूरध्वनी बंद काळातील बिलांचा भरणा केल्याशिवाय ‘आउटगोइंग कॉल’ सुरू केले जात नाहीत. ही बाब ‘बीएसएनएल’च्या कल्याण विभागाच्या मुख्य व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्याचा सूचना केल्या आहेत. यात ज्या ग्राहकांचे दूरध्वनी तांत्रिक कारणामुळे अधिक काळासाठी बंद असतील त्यांनी अर्ज केल्यास देयकांची रक्कम परत मिळू शकेल, असे ‘बीएसएनएल’च्या कल्याण मंडळाचे  मुख्य व्यवस्थापक हरिओम सोलंकी यांनी सांगितले.

पालघर दूरध्वनी विभागातील ग्रामीण एक्स्चेंजअंतर्गत असणाऱ्या केळवे आणि माहीम या गावांमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा चार महिन्यापासून बंद आहे.

बंद फोनचे बिल भरण्याचे आदेश

केळवे आणि माहीममधील ग्राहकांनी दूरध्वनी सेवा बंद असूनही प्लॅनप्रमाणे देयके आल्याचे सांगितले. काही हॉटेल—रिसॉर्टने इंटरनेट दूरध्वनी सेवेसाठी आगाऊ  रक्कम भरल्यानंतर देखील सेवा खंडीत राहिल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे.

गेल्या आठवडय़ात या दोन गावांमधील काही दूरध्वनी सुरू झाले; मात्र त्यावर फक्त इनकमिंग कॉल येत आहेत. काही ग्राहकांनी या संदर्भात विचारणा केली असता, बिलांची थकबाकी असल्याने आउट—गोईंग कॉल बंद केल्याचे सांगण्यात आले. दूरध्वनी पूर्णपणे ठप्प असताना हजारो रुपयांची बिल का भरावी? असा सवाल दूरध्वनी ग्राहक करीत आहेत.

दूरध्वनी सेवा बंद पडल्यांतर काही काळ नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. ‘आऊटगोइंग कॉल’ बंद असल्याने नागरिकांना दूरध्वनी देयके भरावी लागल्याची माहिती केळवे आणि माहीममधील काही नागरिकांनी मध्यंतरी ‘लोकसत्ता पालघर’कडे केली होती.

आधी नकार, नंतर मंजुरी

या संदर्भात पालघरच्या दौऱ्यावरील आलेल्या ‘बीएसएनएल’च्या कल्याण विभागाच्या मुख्य व्यवस्थापक हरिओम सोळंकी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तक्रार पहिल्यांदा फेटाळून लावली. या दोन्ही गावांमधील एक्स्चेंज पूर्णपणे कार्यान्वित असून कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड नसल्याने सोलंकी यांनी भूमिका घेली होती. मात्र नंतर काही ग्राहकांशी संवाद साधल्यानंतर सत्यपरिस्थिती समोर येताच त्यांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतले. ग्राहकांशी संवाद साधलेल्या दूरध्वनी क्रमांकांचा तपशीलवार अहवाल द्यावा, तसेच संपूर्ण एक्स्चेंजचा कार्यक्षमता अहवाल देण्याचा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या प्रकरणी लवकरच तोडगा काढू असे त्यांनी सांगितले.