प्रत्येक देशाचे वैभव, तेथील संस्कृती यांची ओळख तेथे वापरण्यात येणाऱ्या चलनी नाण्यावरून होत असते. हे जाणून जगभरातील विविध देशांच्या नाण्यांचा संग्रह जोपासणाऱ्या संजय जोशी यांच्या नाण्यांचे प्रदर्शन ठाण्यातील श्रीनगर येथील टीजेएसबी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी आफ्रिकेतील लायबेरीया देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडींच्या भाषणाचे नाणे तयार केले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून या बोलत्या नाण्याच्या दर्शनाने नागरिक अवाक् झाले.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ठाण्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १९३ देशांची नाणी प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्यामध्ये ३६ देशांच्या प्लास्टिकच्या नोटांचे व ५८ देशांच्या नाण्यांचे दर्शन या प्रदर्शनात घडवण्यात आले. फाळणीच्या प्रसंगी पाकिस्तानला भारताकडून कोटय़वधी रुपये दिले होते. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने तयार केलेल्या या नोटा पाकिस्तानच्या चलनामध्ये होते. मात्र निर्वासित या नोटा भारतात घेऊन आल्यानंतर त्यांना भारतात कोणतीच किंमत नव्हती. १९३५ मध्ये अशाच प्रकारच्या नोटा भारताने बर्मा म्हणजे आत्ताचा म्यानमारसाठी तयार केल्या होत्या. अशा विविध रंजक गोष्टी असलेल्या नोटा या प्रदर्शनात मांडल्या होत्या.

इ.स.पूर्व शंभर वर्षांपूर्वीची नाणीही त्यांच्या प्रदर्शनातून पाहायला मिळाली. सातवाहन ते आजच्या चलनी नोटांपर्यंतचे संकलन त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये अकबर, औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाण्यांचा समावेश आहे. भारतामध्ये पाच हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटाही चलनात होत्या, त्यापैकी काही दुर्मीळ नोटांच्या फोटोप्रतीही त्यांनी संकलित करून ठेवल्या आहेत.