‘द साऊथ इंडियन असोसिएशन’ संस्थेचा पुढाकार

केवळ आर्थिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून डोंबिवलीतील ‘द साऊथ इंडियन असोसिएशन’ने (एसआयए) शहरात ‘फिजिओथेरपी’ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतेक सर्व परवानग्या संस्थेने मिळविल्या आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता मिळाली की तात्काळ हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

‘फिजिओथेरपी’ महाविद्यालय सुरू करण्याचा ‘एसआयए’ संस्थेचा प्रस्ताव सध्या शासन स्तरावर अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, वाडा, भिवंडी, कसारा, कर्जत ग्रामीण या भागांत अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थी केवळ आर्थिक समस्यांमुळे किंवा घराजवळ योग्य सोयीसुविधा नसल्यामुळे इच्छा असूनही वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘साऊथ इंडियन असोसिएशन’ संस्थेचे सचिव के. व्ही. रंगनाथन यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून संस्थेने हे महाविद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाच्या विविध विभागांच्या अत्यावश्यक परवानग्या मिळविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष टी. एन. मुत्तूकृष्णन, सहकोषाध्यक्ष कार्तिक सुब्रमण्यम व कार्यकारी मंडळ प्रयत्नशील आहे. डोंबिवली एमआयडीसीतील सागर्ली गावात संस्थेचे पदवी महाविद्यालय आहे. तेथे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

याच आवारात स्वतंत्र इमारतीत फिजिओथेरपी महाविद्यालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. नाशिकच्या ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’, ‘डीएमयूआर’ या संस्थांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अखत्यारीत वैद्यकीय शिक्षण विभाग येतो. त्यांची भेट घेऊन संस्था पदाधिकाऱ्यांनी हे महाविद्यालय लवकर सुरू व्हावे यासाठी शासनाच्या अत्यावश्यक परवानग्या लवकर मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.

फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून विद्यार्थी प्रवेशक्षमता ४० असणार आहे, असे कार्तिक सुब्रमण्यम यांनी सांगितले.

साऊथ इंडियन संस्थेचा डोंबिवलीत ‘फिजिओथेरपी’ महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आला आहे. मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याशी बोलून या प्रस्तावाला तातडीने अंतिम मंजुरी मिळवून देऊन हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कल्याण, डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची गरज या महाविद्यालयामुळे पूर्ण होणार आहे.

– रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग