आपण सुखी आहोत, मात्र समाजातील वास्तवाचे भान कवीला असले पाहीजे. २१ व्या शतकातही समाजात गरीब आणि श्रीमंत ही दरी मोठी आहे. समाजातील मोठा  वर्ग आजही दु:खी आहे. या वर्गाच्या दु:खाला काव्यातून वाचा फोडणे ही कवीची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक  नायगावकर यांनी केले.

डोंबिवलीतील काव्य रसिक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दोन दिवसीय काव्य संमेलनाचे आयोजन रोटरी भवन येथे करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन कवी नायगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, आमदार रवींद्र चव्हाण, हेमंत राजाराम, डॉ. प्रल्हाद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पूर्वीच्या काळी तुकाराम, एकनाथ यासारखे थोर संत होऊन गेले. या संतांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या दुखाला वाचा फोडण्याचे काम केले होते. म्हणूनच त्यांचे काव्य आजही लोकांच्या ओठी सहज रेंगाळताना दिसते. त्यांचा वारसा चालविणाऱ्या कवींनी वास्तवाचे हे भान  ठेवणे गरजेचे आहे, असे नायगावकर म्हणाले.